आर. डी. महाजन.लोकमत न्यूज नेटवर्कधरणगाव : जुन्या काळापासून असलेला बीबी का तलाव ज्याला अलीकडे टिळक तलाव असे संबोधले जाते. आज आपली शेवटची घटका मोजत आहे. हा तलाव चारही बाजूंनी अतिक्रमणाच्या वेढ्यात अडकला आहे. या तलावाला आज सुशोभीकरणाची आवश्यकता पडली आहे. तो आपले सौंदर्य पूर्णपणे हरवून बसलेला आहे. गुलाबराव देवकर या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि त्यांच्या भरघोस निधीतून त्यांनी हे ठिकाण सुशोभित करण्याचा प्रयत्न केला. अलीकडेच धरणगाव मध्ये नावारूपाला आलेली तरुणांची संघटना 'जलदुत फाउंडेशन' यांच्यावतीने खोलीकरण करण्यात आले. त्याचाच फायदा म्हणून आज याठिकाणी भरघोस पाणी आहे. परंतु अशा प्रकारची मदत टिळक तलावाला मिळालेली नाही. मागील शासनाने सुद्धा वेळोवेळी त्यासाठी काही निधीची घोषणा केली. परंतु तो निधी नगर परिषदेपर्यंत मिळाला की नाही? हाही लोकांना पडलेला प्रश्न आहे? आज तलावाच्या चारही बाजूला घरांचे अतिक्रमण झाले आहे. त्याचप्रमाणे तलावामध्ये पान वनस्पती उगलेल्या आहेत. आजू बाजूच्या गटारीचे पाणी तलावात उतरवले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डासांचे साम्राज्य आहे. पाणी तर त्या ठिकाणी नाहीत परंतु भिंती सुद्धा पडलेल्या अवस्थेत आहेत.
धरणगाव नगरपालिकेला पर्यावरण विभागामार्फत शिवाजी तलाव व टिळक तलाव संवर्धनासाठी २ कोटी निधी मंजूर झाला असून कामासाठी २५ लाख रुपयांचा पहिला हफ्ता पालिकेस प्राप्त झाला आहे. या प्रकल्पासाठी सविस्तरपणे प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. -निलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव