कोरोना परिणाम : रसिकांकडून मदतीचा हात देण्याचे आवाहन
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे इतर घटकांवर परिणाम होत असताना, यात लोककलावंतांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. कोरोनामुळे नाटक, तमाशा आदी मनोरंजनाची साधने बंद असल्याने या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी रसिकांनी या खान्देशातील लोककलावंतांना आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदचे मुख्य संघटक विनोद ढगे यांनी केले आहे
आजच्या अत्याधुनिक इलेक्ट्राॅनिक्स माध्यमाच्या युगात लोककलेचे जतन व तिचे सादरीकरण करणाऱ्या लोककलावंतांची अवस्था कोरोनामुळे अत्यंत बिकट होत चालली आहे. कलावंतांच्या दैनावस्थेकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात दहा तमाशा फड असून, त्यावर दीड ते दोन हजार लोककलावंतांची उपजीविका आहे. तसेच शाहिरी, गोंधळी, वाघ्या-मुरळी, वहीगायन, सोंगाड्या पार्टी, वासुदेव आदी कलावंतही आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत.
तरी खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून या लोककलावंतांना महिनाभर पुरेल, अशा जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. तरी रसिकांनी यासाठी पुढाकार घेऊन मदत करण्याचे आवाहन विनोद ढगे यांनी केले आहे.