वादळ वाऱ्यासह कोसळल्या जलधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:19+5:302021-06-16T04:22:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वादळ व वाऱ्यासह मंगळवारी दुपारी पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० मिनिटे जलधारा सुरू होत्या. ...

A torrential downpour with stormy winds | वादळ वाऱ्यासह कोसळल्या जलधारा

वादळ वाऱ्यासह कोसळल्या जलधारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वादळ व वाऱ्यासह मंगळवारी दुपारी पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० मिनिटे जलधारा सुरू होत्या. त्याचवेळी सुरू असलेल्या वाऱ्यांमुळे पाऊस थांबला. सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. सोसाट्याचा वार असल्याने मुक्ताईनगर भागात रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले. या अपघातात रिक्षा चालक बालंबाल बचावला.

जून महिन्याचे पहिले पंधरा दिवस आकाशात दाटी करणाऱ्या ढगांनी फक्त पावसाची वर्दी दिली होती. मात्र धरित्रीला चिंब भिजवणारा पाऊस काही पडला नव्हता. त्यामुळे सर्वचजण आभाळाकडे डोळे लावुन बसले होते. अनेक शेतकरी पेरण्या आटोपून पाऊस कधी पडतोय, याची वाट पाहत होते. मंगळवारी दुपारी वर्दी देणारे ढग अचानक बरसु लागले. जळगावसह परिसरात दुपारी १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस पडला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

रिक्षा चालक बचावला

अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनधारक व नागरिकांची मोठी धावपळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मुक्ताईनगर भागातील एक झाड रिक्षावर कोसळले. त्यात रिक्षा चालक शंकर एरंडे यांनी प्रसंगावधान राखत रिक्षातून बाहेर पडल्याने बचावले. रस्त्यावर साहित्य विक्री करणाऱ्या हाॅकर्सची मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली. पाणी व वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेकांनी वाहने थांबवित रस्त्याच्या बाजूला थांबले.

शहरात ठिकठिकाणी सखल भागात तुंबले पाणी

पावसामुळे शहरातील नेहरू चौक, गोलाणी मार्केट, नवीपेठ, पद्मालय विश्रामगृह समोर, कोर्ट चौकाकडून गणेश कॉलनीकडे जाणारा रस्ता, तसेच जिल्हा क्रीडा संकुला समोरील काही ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. यामुळे विशेषत : पादचारी नागरिकांची रस्त्यावरून चालतांना चांगलीच गैरसोय झालेली दिसून झाली.

पाऊस येताच वीज गायब

जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर शहरातील काही भागात विज पुरवठा खंडित झाला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा विज पुरवठा सुरळीत सुरू झाला. मात्र, मंगळवारी वाघनगर परिसर, रामानंद नगर, महाबळ व इतर भागात सकाळपासून विजेचा लंपडाव सुरू होता. यामुळे नागरिकांचा उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

दमदार पावसाची प्रतीक्षा

जळगाव शहरात मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी तुरळक पाऊस झालेला असली तरी परिसरातील शेताबांधांमध्ये मात्र शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील आटोपल्या आहेत. दुपारी अचानक पावसाला सुरूवात झाली. मात्र अजूनही पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Web Title: A torrential downpour with stormy winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.