जळगाव : एमआयसी-एआयसीटीई यांनी टॉयकॅथॉन २०२१ ग्रँड फिनालेसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली आहे. यामध्ये देशभरातील १६ संघांनी सहभाग घेतला असून २२ ते २४ जूनपर्यंत ही स्पर्धा होणार असल्याची माहिती गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समन्वयक महेश पाटील, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.
टॉयकॅथॉन हे शिक्षण मंत्रालयासह अन्य पाच मंत्रालयांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल टॉयकॅथॉन हे नोडल सेंटर म्हणून काम करीत आहे. ही स्पर्धा फिजिकल टॉयकॅथॉन व डिजिटल टॉयकॅथॉन या दोन प्रकारात होणार असून मंगळवारपासून होणारी स्पर्धा ही डिजिटल पध्दतीने होणार आहे. यामध्ये देशभरातील सुमारे १४ हजार १३० संघांनी नावीन्यपूर्ण खेळण्यांवर १७ हजार ७७० वेगवेगळ्या कल्पना सादर केल्या आहेत. मंगळवारी स्पर्धेत १ हजार ५६७ संघ व ८५ नोडल सेंटरमध्ये सहभागी असतील. तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या स्पर्धेसाठी देशभरातील १६ संघ सहभागी झाले असून यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील दोन संघांचा सहभाग आहे. ऑनलाइन पद्धतीने या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ८ वाजता होणार असून त्याला गोदावरी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, डॉ. प्रकाश जाधव यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.