चाळीसगावात शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी जागेचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:31 PM2018-09-28T22:31:58+5:302018-09-28T22:36:06+5:30
चाळीसगाव येथील सिग्नल चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ६८० चौ. मि. जागा नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
चाळीसगाव : येथील सिग्नल चौकात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासह शिवसृष्टीसाठी लागणारी त्रिकोणातील ६८० चौ.मी.जागा जिल्हाधिका-यांनी नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश गुरुवारी दिले असून पुतळा व शिवसृष्टी भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे नागरिकांसह शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.
आमदार उन्मेष पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.
सिग्नल चौकात पालिकेतर्फे शिवछत्रपतींचा पुर्णाकृती पुतळ्यासह शिवसृष्टी उभारण्याचा मनोदय आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जागेचा प्रश्न सुटत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी सामाजिक संघटनांनी आंदोलने सुरुच ठेवली होती. सर्व्हे क्र.५१ मधील पाच हजार ९२३.६० चौ.मी. पैकी ६८० चौ.मी. जागा पुतळ्यासाठी पालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. जळगाव येथील नगर रचना विभागाने ३० आॅगस्ट २०१७ रोजीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील जागेवर सुशोभिकरणास मान्यता दिली होती. यानंतर याबाबत सातत्याने आमदार यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. गुरुवारी जिल्हाधिका-यांनी जागा हस्तांतर केल्याचे आदेश तहसिलदार व मुख्याधिकारी यांना दिले आहे.