शरद ऋतूत उत्साह, चैतन्य घेऊन येणारा सण दसरा. अश्विन महिन्याच्या दशमीला विजयाचा दिवस म्हणून विजयादशमी असंही म्हणतात. निसर्गाशी सुसंवाद साधण्यासाठी अनेक सण आपल्या संस्कृतीत आहेत. त्याला धार्मिक महत्त्व असतं. तसंच वैज्ञानिक कारणही असतं. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. पांडवांनी वनवासातून परतताना शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे याच दिवशी बाहेर काढली. प्रभू रामचंद्रांनी सोन्याच्या लंकेवर चाल केली तीही याच मुहूर्तावर. रामायण व महाभारत दोन्हींची आठवण करून देणारा एकमेव सण म्हणजे दसरा होय. अजूनही सायंकाळी गावाच्या वेशीवर जाऊन घरातील पुरुष मंडळी आपट्याची पानं आणतात. पानं आणल्यावर त्यांना ओवाळलं जातं. मगच घरी आलेल्यांना आपण ती देऊन शुभेच्छा देतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यानं अत्यंत पवित्र मानला जातो. नवरात्रीची सांगता या दिवशी असल्याने नऊ दिवसांच्या उपवासाची देवीला नैवेद्य दाखवून सांगता करतात. या काळात झेंडूच्या फुलांचं महत्त्व असतं. नवरात्रीत घटाला रोज माळा, दसऱ्याच्या दिवशी दाराची तोरणं लक्ष वेधून घेतात. काही वस्तू या निर्जीव दिसत असल्या तरी आपल्या जीवनात त्यांचं खूप महत्त्व असतं. किंबहुना त्यांच्यामुळेच आपलं जीवन सुखकर होत असतं. आपलं वाहन, जे आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवत असतं त्या गाडीचीही पूजा केली जाते. हा शुभ दिवस असल्यानं सोनं तसेच वस्तूंची खरेदी केली जाते. सरस्वती बुध्दीची देवता. या दिवशी तिचं खास स्मरण केलं जातं. सकाळी देवापुढे पाट ठेवून अभ्यासाची पुस्तकं, हिशेबाची वही, नवीन कपडे, पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. सरस्वतीच्या हातात वीणा असते. तिला संगीत प्रिय असल्यानं या दिवशी संगीतप्रेमी आपल्या वाद्यांची पूजा करून सरस्वतीचा आशीर्वाद घेतात. दिवाळीची चाहूल घेणारा हा आनंदाचा सण सगळ्यांनाच सुखावून जातो. लहान मुलं तर नवीन कपडे घालून, घरोघरी जाऊन भरपूर चॉकलेट वसूल करतात, तर तरुण पिढी गरबा खेळून पदन्यासाने तालासुरात रंगून जातात. पण यावर्षी कोरोनाचं सावट असल्यानं तो आनंद घेता आला नाही. सार्वजनिक स्वरूप साजरे करता आले नाही.रावण दहनातून दुष्ट प्रवृत्तीचा नाश सूचित केला जातो. सर्व अमंगळ जाऊन मांगल्याकडे नेणारा दसरा आनंदाचा असतो.यंदा जरी उत्साह कमी असला तरी दसरा साजरा करू या.-विशाखा देशमुख, जळगाव