जामनेर : मुंदखेडे, ता.जामनेर येथील मंदिरात गुरुवारी होत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे होऊ शकला नाही. विवाह स्थळी कार्यकर्ते पोहचताच काही जणांनी पळ काढला. कार्यकर्त्यांनी काढलेले फोटो व व्हिडिओ पोलिसांना दिले असून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले.कन्हाळा खुर्द, ता.भुसावळ येथील कुटुंबीय दलालासोबत मुंदखेडे येथील मुलीशी लग्न लावण्यासाठी आल्याची माहिती एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याने त्यांनी मुंदखेडे गाव गाठले व मंदिरावर धाव घेतली. येथे लग्नाची तयारी सुरू असल्याने त्यांनी व्हिडिओ शूटिंग केले. याची माहिती पोलीस व गावातील पोलीस पाटील यांना कळविली.सर्वच गेले पळूनया संदर्भात पोलिसांना कळविल्याचे समजताच दोन्ही बाजूच्या मंडळींनी पळ काढला. या काही वेळातच या ठिकाणी पोलीस पाहोचले. पोलीस कॉन्स्टेबल विलास चव्हाण, हंसराज वाघ, मनोज धनगर यांनी घटनास्थळी येत चौकशी केली. पोलिसांनी संबंधित मुलगी व तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली व त्यांना समज दिली. एकता परिषदेचे अध्यक्ष सुधाकर सोनवणे, एस.जी. शेवाळे, राजू मोरे यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. असे प्रकार तालुक्यात वारंवार होत असल्याचे तक्रारीत नमुद आहे.
आदिवासी परिषदेने रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:52 PM