सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यासोबतच बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी ३०-३०-४० चे सूत्र ठरविण्यात आले. या सूत्रानुसार दहावी व अकरावीत मिळालेल्या बेस्ट ऑफ थ्री विषयांतील गुण विचारात घेतले जाणार आहेत. तसेच बारावीचे अंतर्गत गुण विचारात घेऊनच बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, अनेक विद्यार्थी अकरावीला रेस्ट इयर समजतात, तर काही विद्यार्थी अकरावी पासूनच बारावी अभ्यासक्रमाच्या तयारीला लागतात. अकरावीचे वर्ष क्लासेसमध्ये घालतात. त्यामुळे अकरावीच्या गुणांकडे दुर्लक्ष होते. आता बारावीचा निकाल जाहीर करताना, अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यात दहावीला कमी गुण मिळाले, तरी बारावीला चांगला अभ्यास करून चांगले क्षेत्र निवडण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या सूत्राचा फटका बसणार आहे.
३० टक्के सूत्र गणित बिघडविणार!
बारावी सायन्स असल्याने वर्षभर अभ्यास केला़ त्यामुळे वर्षभराच्या अभ्यासावरच चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, मागील दोन वर्षांच्या गुणवत्तेवर बारावीचा निकाल जाहीर करणे म्हणजे अपेक्षाभंग आहे.
- अक्षदा पाटील, विद्यार्थिनी
------
परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र, परीक्षाच झाली नसल्याने वैयक्तिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यातच दहावी, अकरावी गुणवत्ता बारावीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालावर थोडाफार परिणाम होईल.
- ओम पाटील, विद्यार्थी
-------
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते़ परीक्षा होईल, असे वाटत होते़ पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली. ३०-३०-४० या सूत्रांनुसार बारावीचा निकाल लागणार आहे. दहावीत विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळविले. पण, अकरावीला रेस्ट इयर समजून विद्यार्थ्यांनी बारावीला फोकस केले. परिणामी, अकरावीला काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले. त्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. पण, विद्यार्थ्यांनी या निकालाचा ताण न घेता पुढील परीक्षांवर फोकस करावे. सीईटी, जेईई, नीट यासह परीक्षांचा अभ्यास करावा.
- प्रा.अतुल इंगळे, मू.जे़ महाविद्यालय
०००००००००००००
विद्यार्थ्यांनी निकालाचा ताण घेऊ नये. सीईटी, नीट, जेईई या परीक्षांकडे लक्ष द्यावे. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू ठेवावा. त्याचप्रमाणे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुध्दा सीईटीचा अभ्यास सुरू ठेवावा. जेणेकरून त्यांना हवे ते महाविद्यालय प्रवेशासाठी मिळेल.
- प्रा़ शिवराज पाटील, नूतन मराठा महाविद्यालय
००००००००००००००
जिल्ह्यातील बारावीतील विद्यार्थी : ४९,४०३
विज्ञान शाखा : २०,१९४
कला शाखा : २०,४९१
वाणिज्य शाखा : ६,२९५
एसीव्हीसी : २,४२३