जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ४.१९ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडले असून धरणातून बुधवारी २७ हजार ४७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ९३.४ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची १५१.४ मिमी पाऊस जामनेर तालुक्यात तर सर्वात कमी ५५.६ मिमी पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे.जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, अभोरा, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा एक हजार ४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी इतका आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा एक हजार २७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी इतका असून बुधवारअखेर या प्रकल्पांमध्ये ११८.७९ दलघमी म्हणजेच ४.१९ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.६८ टीएमसी, गिरणा १.३७ टीएमसी तर वाघूर धरणात १.१४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.जळगावची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास होणार मदतवाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी ३ जुलैपर्यंत ९५ मिमी पाऊस पडला होता. तर यावर्षी ३ जुलैपर्यंत १३९ मिमी पाऊस पडल्याने जळगाव शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. गेल्या २४ तासात हतनूर धरण क्षेत्रात १० मिमी, गिरणा धरण क्षेत्रात ८ मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात ५ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी इतका असून ३ जुलैअखेर या प्रकल्पांमध्ये १४.८२ दलघमी म्हणजेच ०.५२ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.वार्षिक सरासरीच्या १४.१ टक्के पाऊसगेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. जिल्ह्याच्या काही भागात दररोज पडणारा पाऊस काही तालुक्यातील पेरणीला पुरक ठरत असून काही तालुक्यातील पिकांना जीवदान मिळण्यास मदत होत आहे. बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसाने ३ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९३.४ टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलीमीटर असून मागील वर्षी ३ जुलै २०१८ पर्यंत वार्षिक सरासरीच्या १८.६ टक्के म्हणजेच १२२.७ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी फक्त ९३.४ मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या केवळ १४.१ टक्के इतका पाऊस झाला आहे.जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता ३ जुलैपर्यंत सर्वाधिक १५१.४ टक्के पाऊस जामनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच ५५.६ टक्के पाऊस अमळनेर तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात ३ जुलै रोजी एका दिवसात १७.२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.३ जुलैपर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये (कंसात वार्षिक सरासरीशी टक्केवारी)जळगाव - ७४.३ मिलीमीटर (१०.८ टक्के), जामनेर- १५१.४ मि.मी., (२१.०), एरंडोल- १२७.५ मि.मी. (२०.५), धरणगाव - ७२.९ मि.मी. (११.७), भुसावळ - ८२.० मि.मी. (१२.३), यावल - ८५.६ मि.मी. (१२.३), रावेर - ९०.१ मि.मी. (१३.५), मुक्ताईनगर - १३१.२ मि.मी. (२१.०), बोदवड - १२५.६ मि.मी. (१८.८), पाचोरा - १२५.५ मि.मी. (१६.९), चाळीसगाव - ८२.१ मि.मी. (१२.४), भडगाव - ६५.९ मि.मी. (९.८) अमळनेर - ५५.६ मि.मी. (९.६), पारोळा - ६५.२ मि.मी. (१०.३), चोपडा - ६५.८ मि.मी. (९.५) याप्रमाणे जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या २.९ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
हनूतर धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:06 PM