अमळनेरात दोन घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 09:04 PM2021-06-05T21:04:25+5:302021-06-05T21:04:40+5:30
घरमालक लग्नाला गेलेले असताना अज्ञात चोरट्यानी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिन्यांसह, रोख रक्कम असा सव्वालाखाचा ऐवज चोरून नेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : घरमालक पुतणीच्या लग्नाला गेलेले असताना अज्ञात चोरट्यानी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिन्यांसह, रोख रक्कम असा सव्वालाखाचा ऐवज चोरून नेल्याची व दुसऱ्या घरातून ४० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना ४ रोजी आर. के. नगरजवळील मुंदडा नगर ४मध्ये घडली.
संजय रतीलाल धनगर (मुंदडानगर) हे ३ रोजी दुपारी २ वाजता पुतणीच्या लग्नासाठी लामकाणी (जि. धुळे) येथे लग्नासाठी गेले असता ४ रोजी त्यांना त्यांचे मामेभाऊ बापूराव संगोरे यांचा फोन आला की, तुमच्या घरचा कडी कोंडा तोडलेला दिसून येत असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहे.
संजय धनगर यांनी घरी येऊन खात्री केली असता घरातील वरच्या मजल्यावरील कपाट तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस गेलेले दिसले. त्यात १ लाख ६० हजारांचे मणी मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, १० ग्रॅम वजनाचे कानातले, १५ हजार रुपयांची ३० भार चांदी, ४८ हजार रुपये रोख असा माल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. त्याचवेळी त्यांनी आर.के. नगरमधील सर्वज्ञ नगरमधील विलास शिवाजी पाटील यांना ही घटना कळवली. त्यांनीदेखील त्यांच्या घरातदेखील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असे एकूण ४० हजार रुपयांची चोरी झाल्याचे सांगितले. घटनास्थळी डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात चोराविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.