जळगाव : बांभोरी पुलावर शनिवारी दुपारी साडे तीन वाजता दोन कार एकमेकावर धडकल्या. त्यात दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले. दोन्ही कारला असलेल्या एअरबॅगमुळे कारमधील प्रवाशांचा जीव वाचला. एका कारमध्ये तीन महिला होत्या. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जाणारी कार (क्र.एम.एच.१९ सी.झेड.२१८५) पाळधीकडून येणाऱ्या कारवर (क्र.एम.एच.१९ सी.व्ही.४८६१) धडकली. यात दोघं कारचे नुकसान झाले. दरम्यान, एका कारमधील नागरिक कार सोडून दुसऱ्या वाहनाने पुढच्या मार्गाला निघून गेले. या अपघातामुळे दोन्ही बाजुंनी एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील, विजय पाटील, मंगेश बोडके व मुकूंद बागलाणे यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. ही वाहतूक सुरळीत होत नाही, तितक्यात पुलाजवळ सुरत जाणारी ट्रॅव्हल्स बस बंद पडली. त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक पोलिसांनी धक्का देऊन ही बस रस्त्याच्या बाजुला घेतली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.