पवन एक्सप्रेस मधून दोन कोटींसह दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:36 PM2020-02-14T12:36:34+5:302020-02-14T12:37:08+5:30
खंडवा स्थानकावरील कारवाई
जळगाव : मुंबईतील बांधकाम व्यावसायिक महिलेचे दोन कोटी रुपये घेऊन पसार झालेल्या दोन जणांना खंडवा रेल्वे स्थानकावर १२ रोजी रात्री ९.३० वाजता अटक करण्यात आली. विनोद कुमार झा व अक्षय अनंत परवडी अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मुंबई अंधेरी येथील बांधकाम व्यवसायिक एस.जे.ठाकरे या महिलेच्या ओळखीतील विनोद कुमार झा याने बांधकाम व्यवसायासाठी सहा कोटीची रक्कम तुम्हाला मिळवून देतो यासाठी आधी दोन कोटी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्हाला ठेव ठेवावी लागेल असे सांगितले. यानुसार ठाकरे यांनी आपला सहाय्यक अक्षय अनंत परवडी (२५) यास पाठवत पैशाची व्यवस्था केली. यानंतर हे दोघे तेथून ठाणे येथे पोहोचले.
ठाणे येथील रेल्वेस्थानकाबाहेर या संशयित आरोपीने ही अक्षयला सांगितले की, तुम्ही इथेच थांबा मी रक्कम भरून येतो. यावेळी झा व त्यासोबत असलेला अमित यादव हे बॅग घेऊन गेले तर नंतर आलेच नाही. याबाबत अक्षय परवडी याने तत्काळ ठाकरे यांना घटनेची माहिती दिली.
त्यांनी मुंबई गुन्हे शाखेमध्ये तक्रार केल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. भुसावळ विभागाचे सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव व सहाय्यक उपाआयुक्त बी. पी कुशवाह यांना तत्परतेने सर्व यंत्रणेस कामास लावले.
संशयित मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात
संशयित आरोपी गाडी क्रमांक ११०६१ मुंबई- लखनऊ पवन एक्सप्रेसमधू प्रवासी करीत असल्याचे १२ रोजी असल्याचे समजले. पथकाने दोघा संशयितांना खंडवा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन वरून रात्री ९:२५ वाजता रकमेसह पकडले. खंडवा रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एम. के. खोजा, उपनिरीक्षक प्रवीण मालवीय, सहाय्यक उपनिरीक्षक अमित तडवी, आरक्षक दीपक तायवाडे, रमण बावणे तसेच खंडवा लोहमार्ग पोलिसाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलसिंग बघेल, पुष्पेन्द्र कुमार यांनी ताब्यात घेतले. १३ रोजी खंडवा रेल्वे कोर्टाच्या आदेशानुसार संशयित आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.