लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आसोदा येथे कोरोनाचा कहर वाढत असल्याने गावात रुग्णांची संख्या शंभरावर पोहोचली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह गावातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी शुक्रवारपासून दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यात शुक्रवारी सकाळी पाच वाजेपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत जनता कर्फ्यू लागू राहणार आहे.
या बंदमध्ये दवाखाने, मेडिकल, डेअरी वगळता भाजीबाजार, किराणा दुकाने, हाॅटेल, बिअर बार व सर्व प्रकारची दुकाने, फेरीवाले बंद राहणार आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने दुकानदारांना नोटीस देऊन स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर ग्रामपंचायत प्रशासनामार्फत दंड किंवा पोलिसात गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.