जळगाव : वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शनिवार,१८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता धरणाचे दोन दरवाजे २.५ सें.मी.ने उघडण्यात आले आहे. पाण्याच्या विसर्गामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. धरणात आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने धरणाचे दोन दरवाजे शनिवारी संध्याकाळी उघडण्यात आले. २.५ सें.मी.ने उघडण्यात आलेल्या या दरवाज्यांमधून सध्या १६९ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.