लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दापोरा येथे दोन हजार ब्रास अवैध वाळू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली. गुप्ता यांनी याबाबत सोशल मीडियावर लाईव्ह केले. सायंकाळी अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हा सनियंत्रण बैठकीत त्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. तातडीने ही माहिती तहसीलदारांना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तहसीलदारांच्या पथकाने सायंकाळी उशिरा या ठिकाणाला भेट देऊन पंचनामा केला.
दापोरा येथे गिरणा नदीपात्रात दापोरा - लमांजन पुलाचे काम सुरू आहे. हे काम घेणाऱ्या ठेकेदार संस्थेने या पुलाचा पाया खोदताना निघालेले गौण खनिज नदीपात्राला लागून असलेल्या भागात ठेवले. मात्र, नियमानुसार १०० मीटरच्या आत गौण खनिज ठेवले पाहिजे. तसेच उत्खनन करताना त्याची परवानगी घ्यायला हवी, हे नियम ठेकेदाराने पाळले नसल्याचा आरोप दीपककुमार गुप्ता यांनी केला. या वाळूच्या ढिगांची पाहणी गुप्ता यांनी केली आणि त्याचे व्हिडिओ प्रशासनाला दिले.
बैठकीत मिळाली माहिती अन् यंत्रणा हलली
सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळू उपसा रोखण्याच्या नियंत्रणासंदर्भात बैठक सुरू होती. गुप्ता यांची तक्रार याचवेळी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी ही माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांना दिली आणि कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. आधी निवासी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, गावचे तलाठी यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास स्वत: तहसीलदारदेखील तेथे पोहोचले.
------
लमांजन - दापोरा पुलाच्या फाऊंडेशनच्या कामासाठी जे खोदकाम केले त्यातून ती वाळू बाजूला निघाली. तीच वाळू तेथे लावण्यात आली आहे. आम्ही इतर कुठूनहीही वाळू आणलेली नाही. कुणीही येऊन ही वाळू बघु शकतो. - राहुल महाजन, ठेकेदार
सायंकाळी दापोरा येथील या प्रकाराची माहिती मिळाली. ही माहिती लगेचच जळगावच्या तहसीलदारांना देण्यात आली. त्यांचे पथक तेथे तपासणीसाठी गेले आहे. हा वाळू साठा अवैध आहे की, वैध याची तपासणी आहे. अवैध असेल तर कार्यवाही केली जाईल. - प्रवीण महाजन, अपर जिल्हाधिकारी, जळगाव.