बेलदारवाडीत बाळू मामांच्या मेंढ्यांचे अनोखे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:01 PM2020-12-24T16:01:31+5:302020-12-24T16:07:54+5:30
गुरुवारी बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणाऱ्या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : मजल-दरमजल करीत पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या बाळूमामांच्या मेंढ्यांविषयी ग्रामीण भागात आपुलकीसह भक्तिभावदेखील पहावयास मिळतो. या मेंढ्या साधारण डिसेंबरच्या पूर्वाधात चरण्यासाठी दाखल होत असतात. तीन ते चार महिने त्यांचा गावोगावी मुक्काम असतो. गुरुवारी बेलदारवाडी दोन हजाराहून अधिक बाळूमामांच्या शिंगे असणाऱ्या मेंढ्यांचे दोन दिवसीय मुक्कामासाठी आगमन झाले. ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने त्यांचे वेशीवरच स्वागत केले.
पाठीवर संसाराचे बिऱ्हाड आणि सोबतीला मेंढ्यांचा तांडा. धनगर बांधवांचे जीवन असे भटकंतीवर असते. मजल-दरमजल करीत यामेंढ्या राज्यभर चरण्यासाठी भ्रमंती करीत असतात. विशेषतः ग्रामीण भागात बाळूमामांच्या या मेंढ्याविषयी गावकऱ्यांना ममत्व असते. यामुळेच मेंढ्या गावात आल्या की, त्यांचे वेशीवरच अबाल-वृद्धांसह स्वागत केले जाते.
सिद्धेश्वर आश्रमात मुक्काम आणि पाहुणचार
गुरुवारी दुपारी २ वाजता बेलदारवाडीत बाळू मामांच्या शिंगे असणाऱ्या मेंढ्यांच्या सात वाड्यांचे आगमन झाले. दोन हजाराहून अधिक मेंढ्या आणि त्यांच्यासोबत असणारे २०० धनगर बांधव यांना येथील सिद्धेश्वर आश्रमात दोन दिवसीय मुक्कामात पाहुणाचार दिला जाणार आहे. आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील निवृत्तीनाथ महाराज तरुण मंडळाचा यात सक्रीय सहभाग आहे.
मेंढ्यासाठी दिले बागायती कपाशीचे शेत
संभाजी केशरलाल कुमावत यांनी आपले दोन एकर बागायती कपाशीचे शेत बाळू मामांच्या मेंढ्यांना चरण्यासाठी उपलब्ध करुन दिले. आपल्या शेताला बाळू मामांच्या मेंढ्यांचे पाय लागले, याचे मोठे समाधान असून म्हणूनच त्यांना चरण्यासाठी हिरव्यागार कपाशीचे शेत दिले, अशी प्रतिक्रिया संभाजी कुमावत यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी एकादशीचा फराळ, शनिवारी गोड शिरा
गुरुवारी रात्री आठ वाजता सिद्धेश्वर आश्रमात आरती झाल्यानंतर मेंढ्यांसोबत आलेल्या धनगर बांधवांना आमटी, भाकरी आणि भात असे जेवण दिले गेले. पंचक्रोशीतील पाचशेहून अधिक भाविकांचीही उपस्थिती होती. शुक्रवारी एकादशी असल्याने साबुदाणा खिचडी, केळी तर रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी दिली जाईल. शनिवारी बाळूमामांसह मेंढ्यांनाही निरोप दिला जाणार असून आठशे भाविकांनादेखील वरण-बट्टी व गुळाचा गोड शिरा असा खान्देशी मेनू असणार आहे, अशी माहिती भाऊलाल कुमावत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. यशस्वीतेसाठी गोरख कुमावत, जितेंद्र कुमावत, प्रकाश कुमावत आदींसह ग्रामस्थ मंडळी सहकार्य करीत आहे.