महावितरण कार्यालयात समन्वय कक्ष स्थापन
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणतर्फे महावितरण कार्यालयात समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना, कुटुंबियांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना महावितरणच्या विविध वसाहतींमधील निवासस्थाने तसेच प्रशिक्षण केंद्रांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. तसेच कोरोना व लसीकरणाबाबत परिमंडल स्तरावर दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत.
पथदिवे बसविण्याची मागणी
जळगाव : रेल्वे स्थानकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने या रस्त्यावर पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
जळगाव : शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दर दिवसाआड दुचाकी चोरीला जात आहेत. पोलीस प्रशासनाने गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कोरोनामुळे जनरल तिकिटाला बंदीच
रेल्वे प्रशासनाने मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला असला, तरी या गाडीलाही कोरोनामुळे जनरल तिकीट बंदच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करूनच प्रवास करावा लागणार आहे. दिनांक ६ मे रोजी धावणाऱ्या या गाडीचे रेल्वे प्रशासनातर्फे तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे.