महावितरणच्या अभियंत्यांने केले प्लाझ्मादान
जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी व सब-ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणचे अभियंता भूषण तेलंग यांनी कोरोनाबाधित रुग्णासाठी नुकताच प्लाझ्मादान केला. भूषण तेलंग हे महावितरणच्या जळगाव विभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. यावेळी अधीक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी, जळगाव रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, मानद सचिव विनोद बियाणी. रक्तपेढीप्रमुख डॉ. प्रसन्न रेदासनी यांच्यासह सब-ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, मंडल सचिव देवेंद्र भंगाळे, जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे (जिंदा) मानद सचिव सचिन चोरडिया आदी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याची जादा दराने विक्री
जळगाव : रेल्वेस्टेशनवरील विक्रेत्यांकडून पिण्याच्या पाण्याची बाटली १५ रुपयांऐवजी २० रुपयांना विक्री करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना पाच रुपये जादा द्यावे लागत आहेत. साधारणपणे बाहेर दुकानांवर ही बाटली १५ रुपयाला मिळत असताना, रेल्वेस्टेशनवरील विक्रेत्यांकडून जादा पैसे आकारण्यात येत असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
जळगाव : जिल्हा परिषदेकडून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, दगडगोटे वर आले आहेत. यामुळे वाहनधारकांना संथगतीने वाहने चालवावी लागत आहेत. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.