मेहुणबारे, ता. चाळीसगाव : गेल्या तीन दिवसांपासून तो ‘सावजा’वर टपून बसला होता, पण शिकार टप्प्यात येत नव्हती. मात्र चौथ्या दिवशी त्याने भरभक्कम लोखंडी जाळी तोडून आत उडी टाकून वासराची शिकार केली. तालुक्यातील वरखेडे शिवारात दरेगाव रस्त्यालगत शेतात सोमवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्याचा थरार समोर आला आणि पुन्हा परिसर बिबट्याच्या दहशतीने घामेघूम झाला.
या घटनेची माहिती अशी की, वरखेडे येथील दरेगाव रस्त्यावरील राजेंद्र भावसिंग कच्छवा यांच्या शेतात गुरांसाठी लोखंडी जाळी बांधून त्याच्या आजूबाजूला ठिबकच्या नळ्या बांधून जाळी बंदिस्त करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे साडेचारला बिबट्या आला व त्याने लोखंडी जाळीला बांधलेल्या ठिबक नळ्या तोडून जाळीत झेप घेतली व तेथे बांधलेल्या वासरूला ओढून नेले. विशेष म्हणजे बिबट्याचा हा थरार कच्छवा यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनीदेखील पाहिला, परंतु भीतीमुळे कोणी पुढे आले नाही.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल संजय चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या बिबट्याच्या भीतीमुळे अनेक शेतकरी धास्तावले आहेत. संबंधित शेतकऱ्यास वनविभागाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्याच्या शेतात हा तिसरा हल्ला असल्याचे सांगण्यात आले. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.