पारोळा, जि.जळगाव : गेल्या ३८० वर्षपासून बालाजी संस्थानची वाहन व रथोत्सवा ची जुनी परंपरा आहे. दरवर्षी ब्रह्मोउत्सवाच्या (नवरात्रोत्सव) दरम्यान मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा केला जातो. पण कोरोनाच्या संकटात वहन व रथोत्सव रद्द झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. या कोरोनाच्या संकटात ३८० वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा पहिल्यांदा खंडित होत असल्याची माहिती विश्वस्त माजी खासदार ए.टी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.धार्मिक परंपरा, पूजाविधी, अभिषेक हे मात्र घरगुती वातावरणात व विश्वस्त मंडळ व मोजके सेवेकरी यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून करण्यात येतील, अशी माहिती संस्थानचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांनी दिली.बालाजी संस्थांनकडून दरवर्षी ब्रह्मोउत्सवात लाकडी चारचाकी गाडी सजवून त्यावर श्री बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान करून मिरवणूक काढण्यात येते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव काढण्यात येतो. 'लक्ष्मीरमणा गोविंद बालाजी महाराज की जय' या नामघोषात एक ते सव्वा लाख भाविकांच्या उपस्थितीत रथ मिरवणूक निघते. पण यंदा कोरोनामुळे मिरवणूक , रथोत्सव रद्द झाले आहे. त्यामुळे भाविक हे सर्व कार्यक्रमांना मुकणार आहे. पण घरगुती वातावरणात जे धार्मिक पूजाविधी होणार आहे ते व श्री बालाजी महाराजांचे दर्शन हे कार्यक्रम लाईव्ह दाखवून ते भक्तांना घरबसल्या टी.व्ही.वर पाहण्यास मिळणार आहे, अशी माहिती विश्वस्त ए. टी. पाटील यांनी दिली.महाप्रसादाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शहरात घरोघरी लाडू प्रसाद वाटप केली जाणार आहे. प्रसाद मिळाल्यावर भाविकांनी मंदिराला यथाशक्ती आर्थिक मदतीचेही आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.पारोळ्यात बालाजी मंदिराची यात्रा म्हणजे २ ते ३ कोटी रुपयांची उलाढालही होत असते. पण यंदा सर्वच कार्यक्रम रद्द झाल्याने व्यापारी व व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.यावेळी संस्थानचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त केशव क्षत्रिय,अरुण वाणी, संजय कासार, दिनेश गुजराथी, डॉअनिल गुजराथी, प्रकाश शिंपी आदी उपस्थित होते.
परोळ्यातील बालाजी संस्थानचा वाहन व रथोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 11:46 AM