व्हेंटिलेटर बनले शोभेच्या वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 02:53 PM2020-10-14T14:53:15+5:302020-10-14T14:54:47+5:30
रुग्णालयात उपलब्ध झालेल्या दहापैकी एकही व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित नसल्याने ते शोभेच्या वस्तू ठरत आहे
मतीन शेख
मुक्ताईनगर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड डेडिकॅटेड कक्षात ४० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून एका तासाला एक जम्बो आॅक्सिजन सिलेंडर संपत आहे. सध्या गंभीर रुग्णांची संख्या घटत असल्याने दर दिवसाला लागणारे २१ आॅक्सिजन सिलेंडरची संख्या आता १७ वर आली आहे, तर रुग्णालयात उपलब्ध झालेल्या दहापैकी एकही व्हेंटिलेटर अद्याप कार्यान्वित नसल्याने ते शोभेच्या वस्तू ठरत आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड डेडिकॅटेड कक्ष सुरू झाल्यापासून आॅक्सिजन सिलेंडरसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. अवघे १५ आॅक्सिजन सिलेंडर उपजिल्हा रुग्णालयाकडे होते. यामुळे अडचणी सोडविण्यास प्रथम बोदवड ग्रामीण रुग्णालयातील २० आॅक्सिजन सिलेंडर आणून रुग्णांना आॅक्सिजन देण्याची सांगड बसविली जात होती.
३० आॅक्सिजन सिलेंडर उसनवारीवर
दिवसभरात लागणारे आॅक्सिजन सिलेंडर २१ आणि उपलब्ध ३० त्यात जळगाववरून भरून आणण्यास भाडे पुरावे म्हणून गाडीत किमान २० सिलेंडर आवश्यक अशा कसरतीतून मार्ग काढण्यासाठी शेवटी आॅक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन कडून ३० सिलेंडर उसनवारी घेतले गेले आणि ५० सिलेंडरच्या भरवशावर रूग्णांना आॅक्सिजन दिले जात आहे
दररोज लागतात १७ सिलेंडर
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड डेडिकॅटेड सध्या कक्षात ४० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना तासा मागे एक आॅक्सिजन सिलेंडर लागत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या दिवसाला २१ ऐवजी १५ ते १७ सिलेंडर लागत आहे. आज रोजी येथे दाखल बाधित रूग्णांपैकी किमान २० ते २२ रूग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे. त्या अनुषंगाने २० तासाचा आॅक्सिजन साठा सध्या उपलब्ध राहत आहे.
व्हेंटिलेटर बंदच
या कोविड डेडिकॅटेड सेंटरला खासदार रक्षा खडसे यांनी केंद्र शासनाकडून १० व्हेंटिलेटर मिळवून दिले आहे, तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी ४ हायफ्लो हे आॅक्सिजन देण्यासाठी उपयुक्त यंत्र मिळवून दिले आहे. शोकांतिका म्हणजे केंद्राकडून आलेले व्हेंटिलेटरचे जुळवणी साहित्य नसल्याने दहापैकी एक व्हेंटिलेटर वापरात नाही. सध्या हायफ्लो यंत्राद्वारेच गंभीर रुग्णना आॅक्सिजन दिले जात आहे.
सध्या कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज रोजी १५ ते १७ आॅक्सिजन सिलेंडर दररोज लागत आहे. रुग्णालयातील व्हेंटिलेटर तांत्रिक जुळवणी साहित्यअभावी अद्याप कार्यान्वित झालेले नाही.
-डॉ.योगेश राणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय ,मुक्ताईनगर