जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये लाळग्रंथीशी संबंधित गंभीर आजारावर अत्यंत गुंतागुंतीची व डॉक्टरांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावणारी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या रुग्णाला यशस्वीपणे उपचार करून गुरूवारी रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
जळगावतील विशाल कॉलनीतील रहिवासी रमेश तलवारे (वय ५४) यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला चार वर्षांपासून त्रास होत होता. डावी बाजू डोक्यापासून हनुवटीपर्यंत दुखायची. ते तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले होते. त्यांना लाळग्रंथी संदर्भात आजार झाल्याचे निदान करण्यात आले. या आजारामुळे चेहऱ्याच्या मुख्य चेतासंस्थांमध्ये इजा होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे भविष्यात चेहरा विद्रूप होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय शल्यचिकित्सा विभागाने घेतला. मात्र, ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि धोका असणारी होती. विभागाचे प्रमुख डॉ. मारुती पोटे व सहकाऱ्यांनी वैद्यकीय कौशल्य पणाला लावत तीन तासात यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर रुग्णाला वैद्यकीय पथकाच्या निगराणी खाली ठेवण्यात आले होते. गुरुवारी, रुग्ण पूर्वपदावर आल्यावर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.