कुऱ्हाड येथील लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:25+5:302021-07-12T04:12:25+5:30
कुऱ्हाड खुर्द, पाचोरा : प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुऱ्हाड खुर्द येथे ११ रोजी लसीकरणाच्या वेळी गोंधळ उडाला. रविवारी ...
कुऱ्हाड खुर्द, पाचोरा : प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुऱ्हाड खुर्द येथे ११ रोजी लसीकरणाच्या वेळी गोंधळ उडाला.
रविवारी सकाळी साठ लसींचे डोस देण्यात येणार होते. गावातील नागरिकांना यासंदर्भात समाज माध्यमात माहिती देऊन सकाळीच ग्रामस्थांनी या केंद्रावर गर्दी केली. काही लोक उपकेंद्राचे गेट तोडून आतमध्ये घुसले. यामुळे याठिकाणी ग्रामस्थांनी प्रचंड लोटालोटी केली. महिला व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा होत्या. प्रत्येक जण म्हणत होते माझा नंबर आहे. परंतु, नागरिकांच्या या गोंधळात आरोग्य कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.
काही नागरिकांनी बाहेरगावच्या लोकांना वशिल्याने लस दिली जात असल्याचा आरोपदेखील केला. या गोंधळातच साठ लसींचे लसीकरण करण्यात आले. बाकीच्या लोकांना लस संपल्याने माघारी फिरावे लागले. तसेच यापुढे गावातील लोकसंख्येच्या दृष्टीने लसीचे डोस वाढवून मिळण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी यावेळी केली.