का रे हा दुरावा...: १७० दाम्पत्यांनी निवडला कोर्टाचा मार्ग
जळगाव : सुरळीत चाललेल्या संसारात वेगवेगळ्या कारणांनी मिठाचा खडा पडून एकमेकांपासून दुरावलेल्या जिल्ह्यातील ११४ दाम्पत्यांना एकत्र आणून त्यांची संसारवेल पुन्हा बहरली आहे. हे कार्य पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षातील सावित्रीच्या लेकींनी केले आहे. त्यांच्या या कार्याला समाजानेही कौतुकाची थाप दिली आहे. १७० दाम्पत्यांनी मात्र कोर्टाचा मार्ग निवडला आहे.
महिलांवर होत असलेले अन्याय, अत्याचार रोखण्यासह त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील या कक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या दिमतीला मनीषा पाटील, सविता परदेशी, संगीता पवार, अभिलाषा मनोरे व वैशाली पाटील आदी महिला पोलिसांची टीम देण्यात आली आहे.या कक्षात काम करणे म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवावे लागते. लहान मुलांची भांडणे कमी होतील, त्यापेक्षाही या कक्षात भांडणे होतात. त्याला रोज सामोरे जाण्यासह पीडितांना न्याय देण्याची जबाबदारी या कक्षातील खाकीतील सावित्रीच्या लेकींवर आहे.
कुटुंब व कामाचा तणाव किंचितही न जाणवू देता अगदी सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत अविरत येथे मिठाचा खडा पडलेल्या कुटुंबाच्या तोंडात साखर टाकण्याचे कार्य चालते. जेव्हा दुरावलेले मन जुळतात..त्यांची मुलं जवळ येतात, या मुलांना आई, वडील मिळतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान दिसते, तेव्हा हीच आपल्या कामाची पावती असल्याचे या रागिणी मानतात.
खूप प्रयत्न करुनही अपयश
जानेवारी २०२० ते मे २०२१ या १७ महिन्यात महिला सहाय्य कक्षाकडे १५९३ जणांनी न्यायासाठी धाव घेतली. त्यापैकी ११४ कुटुंबात यशस्वी तडजोड घडवून आणून त्यांचे तोंड गोड करण्यात या कक्षाला यश आले आहे. त्यापैकी २७० पती-पत्नी अर्ज करुनही दाखल झालेले नाहीत, तर १३० जणांनी न्यायालयातूनच न्याय हवा म्हणून न्यायालयाकडे धाव घेतली. खूप प्रयत्न करुनही पती-पत्नी एकत्र न आल्याने अशा २१२ प्रकरणात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
मुलांमध्ये गुंतला जीव...
या कक्षात तडजोड घडवून आणताना महिला पोलिसांनी लहान मुलांच्या मुद्याला स्पर्श करुन दुरावलेल्या आई, वडिलांचे मन वळविले आहे. मुलांसाठी दोघांनी दोन पाऊले मागे घेण्याची तयारी दर्शवली. अश्रू ढाळत आलेली पत्नी, आई, सासू जेव्हा पती-पत्नी सर्व मतभेद विसरुन एकत्र येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना आपण पाहिले असल्याचे या कक्षातील महिला पोलिसांनी सांगितले. सासू-सासऱ्यांशी वाद, स्वयंपाक व्यवस्थित बनवत नाही, सारखी मोबाईलवर असते, घरातील कामे टाळते या कारणांसह गैरसमजुतीतून संसार दुरावले होते.
अशी आहेत दृष्टिक्षेपातील प्रकरणे
दाखल संख्या : १५९३
एकत्र आलेले दाम्पत्य : ११४
हजरच न झालेले : २७०
कोर्टात गेलेले : १३०
गुन्हे दाखल : २१२
चौकशीवर : ८६७