भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 05:56 PM2019-11-09T17:56:21+5:302019-11-09T17:58:11+5:30

जळगाव : ‘दाही सरती वहन आली एकादशी मोठी, मंग सावरला रथ झाली गावांमधी दाटी’ या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई ...

A vision of devotion, power and culture | भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे घडले दर्शन

भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे घडले दर्शन

Next



जळगाव : ‘दाही सरती वहन आली एकादशी मोठी,
मंग सावरला रथ झाली गावांमधी दाटी’
या खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील ओळीने सुवर्णनगरातील रथोत्सवाची महती सांगण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी कार्तिकी एकादशीनिमित्त रथ चौकातील श्रीराम मंदिरापासून उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात रथोत्सवाला जल्लोषात सुरु झाली.

परिसराला आले यात्रेचे स्वरुप
रथोत्सवाच्या पूर्व संध्येला गुरुवारी सुभाष चौकापासून ते थेट रथ चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला खेळणी, सौदर्य प्रसाधने, पूजेचे साहित्य, नारळ विक्रेते यासह विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल लागले होते. रथोत्वाच्या दिवशी तर सकाळी आठपासून दुकाने उघडली होती. रथोत्सवाचे दर्शंन घेतल्यानंतर खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सुभाष चौकापासून रस्त्यावर मोठी गर्दी होऊन, परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. रस्त्यावरुन चालण्यासाठी वाट राहिली नव्हती.

ठिकठिकणी पोलिसांचा बंदोबस्त
रथोत्सवात कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी दाणाबाजारातील हनुमान मंदिरापासून रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. रथ चौकात तर पोलिसांचा मोठा फौजफाटासह दंगा नियंत्रक पथकही तैनात करण्यात आले होते. महिला पोलिसांचेही पथक तैनात होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सराफ गल्लीतून रथचौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात आली होती. दुपारनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

नागरिकांना मौल्यवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन
रथोत्सवासाठी शहरासह बाहेरील गावांमधूनदेखील मोठ्या संख्येने नागरिक दर्शनासाठी आले होते. श्रीराम मंदिरातून रथोत्सव निघाल्यानंतर वहनाच्या मागे पोलिसांचा मोठा ताफा आणि पोलिसांचे वाहनदेखील होते. यावेळी वाहनांमधून पोलिसांतर्फे मंगळसूत्र, सोनसाखळ््यांवर लक्ष ठेवा, पर्स, मोबाईल, पाकीट सांभाळा, संशयित आढळल्यास पोलिसांना कळवा असे सांगत, चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत होते.


रामभक्तीचा दरवळला सुगंध
झेंडूच्या फुलांनी रथ सजविण्यात आला होता़ यासह ३५ नारळांचे तोरण होते़ अश्वांची सजावट करण्यात आली होती़ अश्वांच्या पायाखाली स्प्रिंग होते़ अश्व हलत असल्याने तेच रथ ओढत आहेत असे वाटत होते़ रथासमोर मोठी रांगोळी साकारण्यात आली होती़ यासह श्रीराम मंदिरात सजावट करण्यात आली होती़ तोरण, लाईटींग व रस्ते दोनही बाजुंच्या रांगोळ्यानी सजले होते़ ठिकठिकाणी रथोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकले होते़ संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते़

पावसाच्या चिंतेमुळे साकडे
गुरूवारी पाऊस पडल्याने भाविकांची तारांबळ उडाली होती़ शुक्रवारी रथोत्सवात पाऊस नको म्हणून श्रीराम मंदिराच्या कळसाजवळ नारळ ठेवून इंद्रदेवांना आवाहन करण्यात आले होते, आणि शुक्रवारी पाऊस आला नाही, हा चमत्कार असल्याचे मंगेश महाराज यांनी सांगितले़

भाविकांची मांदीयाळी
रथाच्या अगदी सुरूवातीला चिमुकल्यांचा छोटा रथ लक्ष वेधून घेत होता़ यानंतर कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे तैलचित्र असलेल्या ट्रॅक्टर, त्यानंतर टाळकरी, भजनी मंडळ व त्यानंतर संत मुक्ताबार्इंची पालखी होती़ ढोल ताशांच्या तालावर तरूणाई थिरकली होती़ यातच रथोत्सवानिमित्त आलेले बासरी विक्रेत्यांकडून सुमधूर सूरही कानावर पडत होता़ भजनी मंडळ भक्तित तल्लीन होऊन भजनं सादर करीत होते़ मेहरूण, देवपिंप्री, वाघोद आदी ठिकाणाहून भजनीमंडळ आलेले होते़ संपूर्ण परिसर राम नामाच्या जयघोषाने निनादला होता़

मान्यवरांची उपस्थिती
आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सीमा भोळे, पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त डॉ़ उदय टेकाळे, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दादा नेवे, वसंत जोशी, शिवाजीराव भोईटे, अ‍ॅड. सुशील अत्रे, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव आदींसह हजारो भाविकांची उपस्थितीत होती़

सुभाष चौकात उसळली गर्दी
सुभाष चौकात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. ६ वाजेच्या सुमारास रथ या ठिकाणी पोहोचला. दीड ते दोन तास या ठिकाणी रथाला लागले. श्रीरामाचा जयघोषाने पूर्ण सुभाष चौक दणाणून गेला होता. विविध दुकानांवर रथोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत होत होते. प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी धडपड सुरु होती. दरम्यान, सुभाष चौकात रथाच्या अगदी सुरूवातीला थोरले वारकरी गृप जुने जळगावतर्फे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे विठ्ठल रूख्मीणींची मूर्ती सजविलेल्या ट्रॅक्टरवर ठेवण्यात आली होती़ याठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती़ त्यानंतर चिमुकल्यांचा छोटा रथात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती़ त्यामुळे हा रथ अधिकच लक्षवेधी ठरला़ त्यानंतर धर्म रक्षक गृप, जय भवानी गृप व श्री साईनाथ तरूण मित्र मंडळातर्फे ट्रॅक्टरवर हनुमानाच्या मोठ्या आकर्षक मूर्तीवर रोषणाई करण्यात आली होती़ ढोल ताशांच्या तालावर तरूणाईचा जल्लोष शिवाय फटाके फोडून सुभाष चौकात जणू दिवाळीच साजरी करण्यात आली.


भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचे घडले दर्शन
 

Web Title: A vision of devotion, power and culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.