लोकमत न्यूज नेटवर्कपहूर/वाकोद ता. जामनेर : वाकोद ता. जामनेर येथील रवींद्र नामदेव महाले याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने वेगळी कलाटणी घेतली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फूटेजवरुन ही घटना उघडकीस आली.
अभिजित चरणदास पाटील (२१, रा. पिंपळगाव कमानी खुर्द ता. जामनेर) व योगेश भगवान आस्कर (२४, रा. वाकोद ता. जामनेर) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी यातील योगेश हा मामा व अभिजीत हा त्याचा भाचा आहे.
दरम्यान, रविवारी रवींद्र याच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. त्यामुळे तणावाचे निर्माण झाले होते.
वाकोद येथील रहिवासी रवींद्र नामदेव महाले याचा मृतदेह पहूर रुग्णालयाजवळील एकुलती रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत आढळून आल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणी प्राथमिक स्तरावर अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
रविवारी दुपारी नातेवाईकांनी मृतदेह पहूर पोलीस स्टेशनच्या समोर आणला व गुन्हा दाखल करून संबधितांना अटक करण्याची मागणी केली. यादरम्यान डिवायएसपी ईश्वर कातकडे व पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी या नातेवाईकांची समजूत काढून अंत्यसंस्काराचे सोपस्कार पूर्ण करण्याविषयी सांगितले. पुन्हा काही वेळाने वाकोद येथील पन्नास ते शंभर युवक मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये धडकले. यावेळी मोठ्या प्रमाणावर तणाव पूर्ण वातावरण निर्माण झाला. उपस्थित अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डिवायएसपी ईश्वर कातकडे व राहूल खताळ यांनी जमावाला शांतता ठेवण्याचे आवाहन केले. नंतर अशोक रामदेव महाले यांच्या फिर्यादीवरून योगेश आस्कर यांच्याविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला. नंतर योगेश व दुसरा आरोपी अभिजित पाटील यास रात्री अटक करण्यात आली.
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे गतीने फिरविली. यासाठी शशिकांत पाटील, भरत लिंगायत, प्रदीप चौधरी, विनय सानप, अनिल राठोड, अनिल देवरे, ईश्वर देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे, ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी मारेकऱ्याला एका दिवसात गजाआड केले.
शनिवारी सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास रवींद्र महाले याच्या गँरेजवर दुचाकी घेऊन योगेश आस्कर गेला होता व गाडी दुरूस्ती करायचे सांगून रवींद्रला सोबत घेऊन शेताच्या दिशेने गेल्याचे वाकोद गावातील एका ठिकाणी लावलेल्या फुटेजमध्ये पोलिसांना आढळून आले. रवींद्र जवळपास दुपारी दोन अडीच पर्यंत योगेशसोबत होता. त्यानंतर तीन ते साडे तीन च्या सुमारास मृतदेह पहूर येथे आढळून आला होता.
कोणत्या कारणासाठी खून झाला, त्याचा तपास सुरू आहे. यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.-ईश्वर कातकडे,उपविभागीय अधिकारी, पाचोरा.