रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:52 PM2019-03-31T16:52:09+5:302019-03-31T16:54:44+5:30
गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ बोदवड शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ही स्थिती कायम आहे. ओडीएच्या योजनेला पाणी येते त्या दिवशी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. हे नेहमीचेच चित्र आहे.
बोदवड, जि.जळगाव : गत वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. केवळ बोदवड शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ही स्थिती कायम आहे. ओडीएच्या योजनेला पाणी येते त्या दिवशी तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण रोजगार सोडून पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. हे नेहमीचेच चित्र आहे.
अवर्षणग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या बोदवड तालुक्यात घोटभर पाण्यासाठी मैलभर फिरण्याचे दृश्य नित्याचेच झाले आहे. एकमेव ओडीएच्या पाण्यावर लाईफ लाईन जिवंत असून, ज्या दिवशी ओडीएच्या पाईप लाईनला पाणी येते त्या दिवशी, तालुक्यात पाण्यासाठी लहान सहान बालकासह बाया बापडे दिवसभर रोजगार सोडून उन्हा-तान्हात पाण्याचे चेंबर तसेच पाण्याच्या व्हॉल्वमधून थेंब थेंब पाणी गोळा करून घेतात व मैला मैलाची पायपीट करून वाहतूक करतात, तर काही ठिकाणी बैलगाडीने पाणी वाहतूक करून रानाशेतातून आणावे लागत आहे.
आजच्या स्थितीत तालुक्यातील जामठी, एणगाव, शेलवड, बोदवड, नाडगाव, राजूर ह्या गावात भीषण पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी रोजगारावर पाणी फिरवून मुलांना छटाकभर जीव आणि किलोभर पाण्याचे ओझे डोक्यावर घेऊन ही पायपिट करावी लागण्याचे चित्र पहावयास मिळते. त्यांना कोणत्याच राजकारणाशी काहीही घेणे नाही. बस पिण्याला पाणी मिळाले पाहिजे, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे.
नाडगाव येथील पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था पाहता बोदवड येथील काही समाजसेवकांनी एकत्र येत पिण्याच्या पाण्याचे टँकर गावात पाठवले असून, प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाण्यासाठी टँकरसमोर लांब रांगा लागल्या होत्या. त्यांनी टँकरने पाणी पुरवणाऱ्या समाजसेवींचे आभारही व्यक्त केले. सदर यासाठी जितेंद्र झांबड, उमेश चोपडा, विनय बाफना या तरुणांनी पुढाकार घेतला आहे, तर ग्रामस्थ त्यांचे आभार व्यक्त करीत आहे.
तर पाणीटंचाईबाबत विरोधी गट नेता देवेंद्र खेवलकर यांची प्रतिक्रिया घेतली असता शहरातील सर्व विहिरींनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. फक्त ओडीएच्या भरवशावर शहर व तालुक्यातील लाभ घेणाऱ्या गावांची तहान भागत आहे, तर सत्ताधारी पक्षांनी योजना मार्गी लावली असती तर ही अवस्था राहिली नसती.
अशीच परिस्थिती बोदवड शहरातील झोपडपट्टी भाग, इंदिरा नगर प्लॉट परिसरात आहे.