जळगाव: तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाऊस, वारा अथवा अन्य संकट आले असता सर्वांनी सतर्क राहावे अशा सूचना जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.राज्यावर तौत्के चक्रीवादळाचे सावट असल्याने काही जिल्ह्यांना या वादळाचा धोका वर्तविला जात आहे. यामध्ये जळगाव जिल्हा नसला तरी नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वादळाचे संकट ओढवले तरी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहे.दरम्यान, गेल्या वर्षीदेखील निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जाणवला होता. यामध्ये केळीसह अनेक पिकांचे नुकसान झाले होते. आतादेखील या तौत्के वादळाचा जिल्ह्याला फटका बसणार नसल्याचे सांगितले जात असले तरी रविवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे यावल, रावेर, चोपडा, जळगाव या तालुक्यात केळीच्या पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात रविवारी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नसली तरी सोमवारी ही माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 10:35 PM