जळगाव - शहरात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असून, अनेक भागात नळ कनेक्शन देण्याचे काम देखील सुरु आहे. काही भागात अमृत अंतर्गत पाईपलाईनचे ट्रायल देखील घेतले जात आहे. गुरुवारी सकाळी पाणी पुरवठा झाल्यानंतर अनेक भागात नव्याने अमृत अंतर्गत बसविण्यात आलेल्या पाईपलाईनीतून पाणी आले होते. दरम्यान, काही भागात अमृतचे व्हॉल्व सुरु राहुन गेले होते. त्यामुळे त्या भागात पाणी पुरवठा करण्यात आला तेव्हा नवीन नळातून पाणी आले होते. मात्र, त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर तो व्हॉल्व बंद करण्यात आला असल्याची माहिती मनपा पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुशील सांळूखे यांनी दिली.
वॉटरग्रेसकडून कचऱ्याऐवजी माती भरण्याचे काम सुरुच
जळगाव - शहराचा दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून शहरात कचऱ्याऐवजी माती भरण्याचे काम सुरु आहे. सामाजिक कार्यकर्ता शफी शेख यांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये अशा प्रकारचे काम सुरु असल्याचे समोर आणले आहे. शेख यांनी याबाबतचा व्हीडीओ देखील केला असून, याबाबत मनपा प्रशासनकडे देखील तक्रार करण्यात आली आहे.
दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात तब्बल २५ अंशाचा फरक
जळगाव - शहरातील वातावरणात मोठा बदल झाला असून, दिवसाचा पारा ३७ अंशावर तर रात्रीचा पारा १३ अंशावर पोहचला आहे. एकाच वेळी जळगावकरांना उन्हाळा व हिवाळा असे दोन ऋतु अनुभवावयास मिळत असून, या बदलत्या वातावरणामुळे रुग्ण देखील वाढत आहेत. दिवस व रात्रीच्या तापमानात तब्बल २५ अंशाचा फरक तयार झाला आहे.
मनपा नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे कोरोना बाधीत
जळगाव - मनपाच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. गुरुवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला. बेंडाळे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांनीही देखील तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मनपा स्थायी समितीच्या सभेला देखील बेंडाळे यांनी हजेरी लावली होती.