भडगाव तालुक्यात पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 03:23 PM2019-03-16T15:23:33+5:302019-03-16T15:24:52+5:30
अशोक परदेशी भडगाव , जि.जळगाव : तालुक्यात वाढत्या उन्हाळी चटक्यांनी जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे ...
अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : तालुक्यात वाढत्या उन्हाळी चटक्यांनी जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. तालुक्यात मळगाव व पिंपरखेड या दोन गावांना शासनाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत, तर तालुक्यात ६३ गावांपैकी नऊ गावांना पाणीटंचाई अधिक दिसत आहे. तालुक्यात आठ गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
भडगाव तहसील व पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यात जानेवारी ते मार्च २०१९ या काळासाठी २६ गावांसाठी ४५ वेगवेगळया उपाययोजना केलेल्या आहेत. या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात एकूण ५५ लाख रुपये खचार्ची अपेक्षित अशी तरतूद केलेली आहे, अशी माहिती नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, लिपीक संदीप बढे यांनी दिली.
एकीकडे तालुक्यात घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. प्रशासन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे गिरणा धरणातून गिरणा नदीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा काठावरील पाणीटंचाईवरील गावांना पिण्याच्या पाण्याची तहान भागण्यास मोठा हातभार लागणार आहे.
नऊ गावांना जास्त पाणीटंचाई
तालुक्यात एकून नऊ गावांना गंभीर स्वरुपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यात तांदूळवाडी, भोरटेक, वसंतवाडी, पासर्डी, आंचळगाव, धोत्रे, पिंपरखेड, तळवण तांडा, मळगाव या गावांचा संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात प्रशासनाने समावेश केलेला आहे.
तालुक्यात दोन गावांना पाण्याचे टँकर सुरू
तालुक्यात मळगाव व पिंपरखेड या दोन गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. ग्रामपंचायतींनी प्रशासनास प्रस्ताव देवून मागणी केली होती.
तालुक्यात आठ गावांना विहिरी अधिग्रहीत
तालुक्यात एकूण आठ गावांना विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यात तांदूळवाडी, भोरटेक, वसंतवाडी, आंचळगाव, पासर्डी, पिंपरखड, तळवण तांडा, धोत्रे आदी गावांचा समावेश आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना केलेल्या आहेत.
तालुक्यात जानेवारी ते मार्चसाठी २६ गावांवर ४५ उपाययोजना
पंचायत समितीमार्फत संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान एकूण २६ गावांसाठी ४५ वेगवगळया उपाययोजना केलेल्या आहेत. यात पाणीपुरवठा विहिरी खोलीकरण करणे, शेवड्या, खाजगी विहिरी अधिग्रहीत करणे, नवीन विंधन विहिरी, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा करणे आदी कामांसाठी एकूण ५५ लाख संभाव्य खर्च अपेक्षित आहे.
तालुक्यात मार्च ते जूनसाठी २१ गावांवर उपाययोजना
तालुक्यात मार्च ते जून २०१९ या दरम्यान एकूण १२ गावांसाठी पाणीटंचाईवर २१ विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या कामासाठी प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात एकूण १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, लिपीक संदीप बढे यांनी दिली.
गिरणा नदीच्या आवर्तनाने पाणीटंचाई होणार दूर
एकीकडे पाणीटंचाईची समस्या असताना दुसरीकडे गिरणा धरणातून गिरणा नदीला आवर्तन सोडल्याने तहान भागण्यास हातभार लागणार आहे. भडगाव शहराचा पाणीपुरवठा करणारा गिरणा नदीवरचा बंधाराही कोरडा झाला होता. गिरणेवरचा सावदे बंधाराही कोरडा पडला होता. मात्र गिरणेच्या पाण्याने या बंधाऱ्यात पाणी साचून पाणी प्रश्न सुटण्यास भर उन्हाळयात हातभार लागणार आहे.