पोलिसी दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:24 AM2021-02-23T04:24:18+5:302021-02-23T04:24:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही ...

We can't live without a police baton! | पोलिसी दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही !

पोलिसी दंडुक्याशिवाय आम्हाला जमतच नाही !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाहतुकीचे नियम मोडण्यात जळगावकर आघाडीवर आहेत. वाहन चालविताना घाई इतकी झालेली असते की, सिग्नलवरही नियमांचे पालन करणे जमत नाही. वाहतूक पोलिसांनी कारवाई केली की, पुन्हा वाद घालायला पुढे अशी परिस्थिती आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या एकट्या शहरात शहर वाहतूक शाखेने ५० हजार ८५५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांची संख्या ९४ हजार ९७५ इतकी आहे.

शहरातील महामार्गावरील आकाशवाणी, अजिंठा चौक, इच्छादेवी या प्रमुख चौकांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. शहरातील कोर्ट चौकातदेखील याचे मोठे प्रमाण आहे. वाहतूक पोलीस नसला की, हे प्रमाण अधिक असते. आकाशवाणी चौकात दोन सिग्नल येतात. तेथे नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. या चौकात तर वाहतूक पोलीस असतानाही लाल सिग्नल असल्यावरदेखील वाहनधारक वाहने दामटताना दिसून आले. मुख्य चौकात पोलीस असतात, तर आकाशवाणीच्या भिंतीला लागून असलेल्या चौकात पोलीस नसल्याने त्याचा गैरफायदा वाहनधारकांकडून घेतला जात असल्याचे प्रकर्षाने जाणवले. काही वाहनधारक तर कारवाईचीही भीती बाळगत नाही. पोलिसांनी मागून आवाज दिला, तर त्याकडे दुर्लक्ष करून वाहनधारक पुढे पळतात. यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. महिलाही नियम मोडण्यात कमी नसल्याचे दिसून आले.

रोज ३५ जणांना दंड

सिग्नल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किमान ३५ जणांवर रोज दंडात्मक कारवाई करण्यात येते. वर्षभरात २४३ जणांनी सिग्नल जम्पिंग केले असून त्यांच्याकडून ४८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक कारवाया आकाशवाणी व अजिंठा चौकात झालेल्या आहेत. शहरातील टॉवर व कोर्ट चौकातही मोठ्या प्रमाणात कारवाया झालेल्या आहेत.

कोट..

सध्या शहरात अमृत योजनेचे काम सुरू असल्याने त्यात सिग्नलच्या वायरिंग तुटल्या आहेत. त्यामुळे सिग्नल बऱ्याच वेळा बंद असतात. दिवसाला एका सिग्नलवर ५० च्यावर कारवाया होतात. लाल सिग्नल असतानाही वाहने दामटणाऱ्या किमान ३० ते ३५ जणांवर कारवाई केली जाते.

-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

वाहनचालक काय म्हणतात...

नियमांचे पालन करणे म्हणजे स्वत:ला शिस्त लावणे, असे आहे. घाई करून पटकन इच्छितस्थळी जायचे असले, तरी त्यात फारसा फरक पडत नाही. १० ते १५ मिनिटे मागेपुढे होऊ शकतात. सिग्नल बंद असले तरीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.

-रमेश पाटील, वाहनधारक

सिग्नलवर घाई करून उपयोग नाही. दंडाची रक्कम भरून माणूस मोकळा होतो, परंतु अपघात झाला तर त्याची भरपाई करता येत नाही. त्यात शरीराचा अवयव निकामी होऊ शकतो, त्याशिवाय वाहनाचे नुकसानही होण्याची भीती असते. त्यामुळे स्वत:चा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करून शिस्त पाळावी.

-संतोष नेटके, वाहनधारक

शहरात वाहतूककोंडी मोठी असते. चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागतात. एकाने नियम मोडला की, त्यामागे चार जण नियम मोडतात. बऱ्याचवेळा गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असते, ती वाढविणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन झालेच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. आम्ही काळजी घेतो.

-रामचंद्र पाटील, वाहनधारक

--

Web Title: We can't live without a police baton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.