जळगाव - भाजपाशी युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली असून, ती कायम रहावी अशी आमची इच्छा आहे. मात्र, भाजपाकेवळ लोकसभेच्या वेळेस शिवसेनेची मदत घेवून घेते. तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या वेळेस मात्र शिवसेनेला दुर ठेवून सत्ता मिळवली जाते. आता जशी आमची मदत घेतात, तशी मदत इतर निवडणुकीत आमचीही करा, असा टोला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी झालेल्या युतीच्या मेळाव्यात भाजपा पदाधिकाऱ्यांना हाणला.रावेर लोकसभेच्या भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सागर पार्कवर झालेल्या युतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपाला युतीच्या मुद्यावर चांगल्याच कोपरखळ्या घेतल्या. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे जिल्ह्यातील सर्व आमदार, मनपा, नगरपालिकेचे नगरसेवक व जि.प.सदस्य देखील उपस्थित होते.आमच्याच लग्नाच्या वेळेस युती का तोडली जाते ?गुलाबराव पाटील म्हणाले की, जि.प., मनपा, नगरपालिकेच्या निवडणूका या कार्यकर्त्यांचा निवडणूका असतात. हा तोच कार्यकर्ता असतो की जो भाजपाला लोकसभेच्या वेळेस मदत करतो. मात्र, त्यांच्या निवडणुकांचे लग्न जवळ आले की भाजपाकडून लगेच फारकत घेतली जाते. आता भाजपाशी ‘लव्ह मॅरेज’ झाले आहे. तर हे लव्ह मॅरेज कायमस्वरुपती टिकवा असेही गुलाबराव पाटील म्हणाले. ही निवडणूक देशाची निवडणूक असून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी लढली जात आहे. यासाठी शिवसेना नक्कीच मदत करेल मात्र इतर वेळेस शिवसेनेला विसरू नका असाही टोमणा त्यांनी हाणला.कॉँग्रेसला जवळ करतात तसे आम्हालाही जवळ घ्याजि.प.मध्ये कॉँग्रेसला जवळ केले आहे. कॉँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचा मुलगा पक्षात घेतला तसेच शिवसेनेलाही जवळ घ्या असेही गुलाबराव पाटील म्हणाले. लोकसभेच्या वेळेस युती जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. इतर निवडणुकांमध्ये मात्र भाजपाचे कार्यकर्ते कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षाही शिवसैनिकांना पाण्यात पाहतात, ही भूमिका आता बदलवायची असून, हिंदुत्वाच्या नावावर झालेली युती कायमस्वरुपी टिकवा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व माजी आमदार चिमणराव पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले.