रेशनचा संप सुरूच
जळगाव : स्वस्त धान्य दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी ऑल महाराष्ट्र शॉपकिपर फेअर प्राईस फेडरेशनच्यावतीने १ मेपासून संप पुकारण्यात आला आहे. हा संप अजूनही सुरूच आहे. याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याने हा संप सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी सांगितले.
विजेचा लपंडाव
जळगाव : महावितरणच्यावतीने भारनियमन केले जात नसले तरी अधून मधून वीज पुरवठा खंडित होत आहे. जिजाऊ नगर भागात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी व दुपारी वीज पुरवठा खंडित झाला. शनिवारी सकाळी ८ वाजेपासून खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी साडेबारा वाजता सुरळीत झाला. भर उन्हाळ्यात शहरवासीयांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
साफसफाईची मागणी
जळगाव : न्यू बी. जे. मार्केट परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. तसेच नाल्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. परिणामी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याची दुरुस्ती
जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्हा पेठेतील थोर सन्मित्र मंगल कार्यालय रस्त्यावर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यासह शहरातील इतर रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.