विवाह समारंभ, हॉटेलवरील निर्बंधामुळे डाळींच्या मागणीत निम्म्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:06+5:302021-07-11T04:13:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विजयकुमार सैतवाल जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान लग्न समारंभ, हॉटेल यांच्यावर बंधने असल्याने डाळींच्या मागणीत ...

Wedding ceremonies, hotel restrictions halve demand for pulses | विवाह समारंभ, हॉटेलवरील निर्बंधामुळे डाळींच्या मागणीत निम्म्याने घट

विवाह समारंभ, हॉटेलवरील निर्बंधामुळे डाळींच्या मागणीत निम्म्याने घट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

विजयकुमार सैतवाल

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान लग्न समारंभ, हॉटेल यांच्यावर बंधने असल्याने डाळींच्या मागणीत चांगलीच घट होऊन मागणी निम्म्यावर आली आहे. मागणी नसल्याने डाळींचे भावही कमी होऊन सर्वच डाळी १०० रुपये प्रति किलोच्या आत आल्या आहेत.

गेल्या महिन्यात ७ जूनपासून अनलॉक होत नाही तोच २० दिवसांत पुन्हा बंधने आली व हॉटेलला केवळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असण्यासह शनिवार-रविवार केवळ पार्सल सुविधांचीच परवानगी देण्यात आली आहे.

मागणीत मोठी घट

बंधनामुळे साहजिकच हॉटेलवरील ग्राहकी कमी झाल्याने हॉटेल चालकांकडूनही लागणारे सर्वच घटक पदार्थ कमी प्रमाणात खरेदी केले जात आहेत. यामध्ये डाळींची मागणी तर निम्म्यावर आली आहे. एरव्ही जळगावातून दररोज जवळपास ७० टन डाळीची विक्री होत असते. ही विक्री आता ३५ ते ४० टनवर आली आहे. हॉटेलवर बंधने असण्यासह विवाह समारंभातदेखील उपस्थितीला बंधने असल्याने सर्वच वस्तूंची मागणी कमी झाली. त्यात आता लग्नसराईदेखील नसल्याने आता आणखीनच मागणीत घट झाली आहे.

भावात घसरण

मागणी कमी असल्याने डाळींचे भाव चांगलेच कमी झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी शंभरीपार असलेल्या डाळी आता शंभरीच्या आत आल्या आहेत. यामध्ये १०० ते १०५ रुपये प्रति किलो असलेली तूर डाळ ९० ते ९५ रुपये प्रति किलोवर आली आहे. मूग डाळ १०० ते १०५ रुपयांवरून ८६ ते ९१ रुपये प्रति किलो, १०२ ते १०७ रुपयांवर असलेली उडीद डाळ ९२ ते ९७ रुपये प्रति किलोवर आली आहे तर ६५ ते ७० रुपये प्रति किलो असलेली हरभरा डाळ ६३ ते ६८ रुपये प्रति किलोवर आली आहे.

डाळीचे भाव घसरणीचे कारण

- कोरोना निर्बंधामुळे हॉटेलवर बंधने

- लग्न समारंभावर बंधने

- स्वस्त धान्य दुकानावर डाळीचे वितरण

- येणाऱ्या मालाचे दर घसरलेले

- केंद्र सरकारकडून साठा मर्यादेचे बंधन

डाळींच्या भावात अशी झाली घसरण

डाळी-दोन आठवड्यांपूर्वीचे भाव-आताचे भाव

- तूर डाळ - १०० ते १०५ - ९० ते ९५

- मूग डाळ - १०० ते १०५ - ८६ ते ९१

- उडीद डाळ - १०२ ते १०७ - ९२ ते ९७

- हरभरा डाळ - ६५ ते ७० - ६३ ते ६८

——————————————

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे हॉटेल, विवाह समारंभांवर बंधने असल्याने डाळींची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भावदेखील घसरले आहेत.

- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन.

Web Title: Wedding ceremonies, hotel restrictions halve demand for pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.