वीकेण्ड लॉकडाऊन नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:15 AM2021-07-26T04:15:48+5:302021-07-26T04:15:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवार व रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, वीकेण्ड लॉकडाऊन दरम्यान मनपा कर्मचारी शासकीय सुट्टीवर राहत असल्याचा फायदा घेत सुभाष चौक परिसरासह शहरातील विविध भागात रविवारचे आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वीकेण्ड लॉकडाऊन आता नावालाच असून, मनपा प्रशासनदेखील आठवड्यातील पाच दिवसच कारवाईवर भर देताना दिसून येत आहे.
कोरोनामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरासह इतर भागांमध्ये भरणाऱ्या सर्व आठवडे बाजार पुढील पाच महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागांवरच व्यवसाय करण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र, मनपाने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय होत नसल्याचे कारण देत हॉकर्स व इतर विक्रेते या जागांवर व्यवसाय करण्यास नकार देत आहेत. तसेच अनेक विक्रेते थेट मनपाच्या पथकाला आव्हान देत मुख्य बाजारपेठ परिसरात व्यवसाय करत आहेत. रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन असतानादेखील हॉकर्सने थेट मुख्य बाजारपेठ परिसरात दुकाने थाटली होती. तसेच या ठिकाणी ग्राहकांचीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून आली.