जळगाव : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. देशात ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केले तर शिवसेना व राष्ट्रवादी फोडली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगावातील जाहिर सभेत केला.
जळगाव येथील सागर पार्क मैदानावर खासदार शरद पवार यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दुष्काळी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर कारण नसतांना लाठीमार करण्यात आला. स्त्री-पुरुषासह लहान मुले जखमी झाले. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आंदोलन झाल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारने आपल्या हातातील सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी ईडी,सीबीआय यांना विरोधकांना संपविण्यासाठी वापरले. माजी मंत्री अनिल देशमुख व आमदार नबाब मलिक यांना तुरुंगात टाकले. सत्तेचा गैरवापर भाजपाने याकाळात केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादीत भ्रष्ट माणसे असल्याचे सांगितले.माझे पंतप्रधानांना सांगणे आहे. जर यात खरे असेल तर संबधित भ्रष्ट नेत्यांवर खटले भरा मात्र हे खोटे असेल तर तुम्ही स्वत: काय कराल हे स्पष्ट करा असे आवाहन त्यांनी केले.