शेतकऱ्यांकडील माल संपल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:20 AM2021-02-27T04:20:03+5:302021-02-27T04:20:03+5:30
जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद, ता. जळगाव : आधीच उत्पादनात घट त्यात शेतकऱ्यांनी होता नव्हता तेवढा माल मिळेल ...
जितेंद्र पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद, ता. जळगाव : आधीच उत्पादनात घट त्यात शेतकऱ्यांनी होता नव्हता तेवढा माल मिळेल त्या भावात विकून टाकल्यानंतर आता कापूस बाजारात मोठी तेजी निर्माण झाली आहे. आवक थांबल्याच्या स्थितीत जेवढा काही कापूस सद्या विकला जात आहे त्यास सुमारे ६००० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटलचा भावसुद्धा मिळत आहे. दरम्यान, कापसाची घोडदौड पुढे काही दिवस अशीच सुरू राहण्याचे संकेत व्यापारीवर्गाने दिले आहेत.
सीसीआयची कापूस खरेदी केंद्रे कार्यान्वित होती तोपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किमतीत त्यांच्याकडील कापूस विकला. भाववाढीच्या आशेने घरात कापूस साठवून ठेवणाऱ्या काहीअंशी शेतकऱ्यांनीच आता आपला माल बाहेर काढला आहे. त्यातही सुरुवातीपासूनच चांगल्या दर्जाचा कापूस राखून ठेवणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर साहजिक व्यापाऱ्यांना गावोगावी कापूस देता का कापूस, अशी आरोळी पिटत फिरावे लागत आहे. कापसाच्या खुल्या बाजारात चांगल्या दर्जाच्या कापसाला सहा हजार रुपयांपासून साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. एरव्ही फरदड कापसाला कोणी फार भाव देताना दिसत नाही. मात्र, सध्याच्या तेजीत फरदड कापसालाही तब्बल ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळताना दिसत आहे.
-----------------
रूई ४६००० रुपये प्रतिखंडी
खुल्या बाजारात कापसाचे भाव वाढल्यानंतर रूईच्या भावातही चांगली सुधारणा झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या कापसाच्या एका खंडीला (३५६ किलो) सुमारे ४६००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळेच कच्च्या कापसाच्या भावातही खुल्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे. यंदा प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन जवळपास निम्म्याने घटले आहे. उत्पादनखर्चाचा विचार करता सध्या मिळत असलेला भाव दिलासादायक असला तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ फारच थोड्या शेतकऱ्यांना होत आहे. चांगल्या भावाच्या आशेने कापूस विकण्याची घाई न करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आताच्या भाववाढीमुळे फायदा होत आहे. तर मिळेल त्या भावात यापूर्वीच कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांवर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
-----------------------
(कोट)...
शेतकऱ्यांकडील बहुतेक कापूस विकला गेल्यामुळे सध्या जिनिंगमध्ये जेमतेम १० टक्के कापसाची आवक होत आहे. मागणीनुसार पुरवठा नसल्यामुळे कापसाच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. रूईचे भाव ४० हजारांवरून ४६ हजार रुपये प्रतिखंडीपर्यंत पोहोचले आहेत.
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग व प्रेसिंग असोसिएशन