सुनील पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एनसीआरबी अर्थात नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोचा २०२० चा अहवाल जाहीर झाला आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात लहान-मोठे असे ५ हजार १६३ गुन्हे घडलेले आहेत. त्यात खुनाच्या ५३ घटना घडल्या असून बलात्काराच्या ८१ घटना दाखल झालेल्या आहेत. त्याशिवाय खुनाचा प्रयत्न १२०, महिलांच्या विनयभंगाच्या २८८ घटनांसह १७७ अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या आहेत. त्यातील १५२ मुलींचा शोध लावण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. २५ मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही.
लहान मुलांचे गुन्हेगारीकडे वळणे असो की मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत चालले आहे. त्याशिवाय १० ते १४ वयोगटातील तीन मुलांचे झालेले खूनदेखील चिंताजनक होते. विशेष म्हणजे हे खून एकाच मुलाने केल्याचे तपासात उघड झाले होते. जिल्ह्यात २०२० मध्ये गंभीर ५ हजार १६३ गुन्हे घडलेले असले तरी ३ हजार ६२९ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचे प्रमाण ७० टक्के आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये प्रत्येक संवर्गातील गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. २०१९ मध्ये ४ हजार ८२९ गंभीर गुन्हे दाखल होते, त्यात ३ हजार ६२५ गुन्हे उघडकीस आले होते. या वर्षी गुन्हे उघडकीस येण्याची टक्केवारी ७५ टक्के इतकी होती तर २०२० मध्ये यात पाच टक्क्यांनी घट झाली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे ६४ गुन्हे मागील वर्षी दाखल झाले होते, तर ९५१ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस रेकॉर्डला आहे.
आत्महत्येच्या घटनांमध्ये सर्वाधिक तरुणांची संख्या जास्त आहे. अल्पवयीन व मतिमंद मुलीवर बलात्काराचा एक गुन्हा २०२० मध्ये दाखल आहे, मात्र तो अद्यापही उघड झालेला नाही.
२०२० मध्ये ५३ जणांचा खून
खून -५३
बलात्कार -८१
आत्महत्या -९५१
खुनाचा प्रयत्न -१२०
भ्रूणहत्या -००
मारहाण -६०६
अपहरण -१७७
अल्पवयीनवर बलात्कार -
विनयभंग -२८८
सायबर क्राइम -२३