वनविभागाकडून पगमार्क शोधण्याची मोहीम : मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ममुराबाद शिवारात बुधवारी मृतावस्थेत आढलेला बिबट्या नेमका आला कोठून ? याबाबतचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. गुरुवारी वनविभागाच्या एका पथकाने या परिसरात पाहणी केली. तसेच बिबट्याचा पदमार्क शोधण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र, परिसरात कोणत्याही ठिकाणी बिबट्याचे पदमार्क आढळून आले नाहीत. शुक्रवारीदेखील वनविभागाकडून या भागात पाहणी केली जाणार आहे. दरम्यान, वनविभागाकडून अजूनही हा बिबट्या आला कोठून ? याबाबत अधिकृतरीत्या काहीही सांगितले जात नाही. मात्र, वन्यप्रेमींनी व्यक्त केलेल्या शंकेनुसार हा बिबट्या सातपुड्यातूनच या भागात आला असण्याची शक्यता आहे.
बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर याबाबतचा व्हिसेरा नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. मात्र, पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते या बिबट्याचा मृत्यू पाण्यात मिश्रीत युरियामुळे झाल्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान, सध्या शेतांमध्ये हरभरा, गहू हे प्रमुख पिके आहेत. या दोन्ही पिकांना युरिया किंवा खते देण्याची वेळ आता नाही. त्यामुळे युरीया मिश्रित पाणी पिल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला अशी शक्यता नसल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच केळीला हे पाणी दिले जात असले तरी हे पाणी ठिबकनेच दिले जाते. त्यामुळे बिबट्या ठिबकद्वारे पाणी पिऊ शकत नाही. यामुळे विषप्रयोगामुळे हा मृत्यू झालेला नसून, बिबट्याला शॉक देऊनच मारल्याची शंका वन्यप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल नाशिकला पाठविण्यात आला असून, दोन दिवसांनंतरच बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकणार आहे.