त्याला एकट्यालाच व्यवसाय करायचाय..
कोरोनामुळे सध्या व्यवसायाच्या वेळांवर निर्बंध आलेले आहेत. दुपारी ४ नंतर व्यवसाय बंद करावे लागत आहेत. तसेच लॉकडाऊनमुळेही अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांनाही नाइलाजाने व्यवसायाकडे वळावे लागले आहे. त्यातही कमी भांडवलाचा व सोपा तसेच अधिक चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून भाजीपाला व्यवसाय करण्यावरच भर दिला जात आहे. त्यामुळे या व्यवसायात सध्या स्पर्धा प्रचंड वाढली आहे. त्याचा प्रत्यय भाजीबाजारात सकाळी लवकर गेल्यावर तेथील विक्रेत्यांच्या आपसातील चर्चेवरून आलाच... दुकान लावण्याची लगबग या विक्रेत्यांची सुरू होती. एका भाजी विक्रेत्याचे नाव घेऊन दुसऱ्याने विचारले की, तो अजून आला नाही का? त्यावर तिसऱ्याने उत्तर दिले की, तो तर पहाटेपासूनच भाजीपाला लिलावाच्या ठिकाणी होता. सगळी घाई तर त्यालाच होती. जणू त्याला एकट्यालाच व्यवसाय करायचाय... पण अजून का आला नाही काय माहिती? या चार वाक्यातूनच या भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात आलेल्या स्पर्धेचा अंदाज आला.