गर्दीवर नियंत्रण कोणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:41+5:302021-06-09T04:21:41+5:30
गेल्या चार महिन्यांपासून जवळपास अत्यावश्यक सेवेचे दुकाने सोडले की, उर्वरित सर्व दुकाने बंद होती. त्यांचा रोजगार गेला होता, व्यवसाय ...
गेल्या चार महिन्यांपासून जवळपास अत्यावश्यक सेवेचे दुकाने सोडले की, उर्वरित सर्व दुकाने बंद होती. त्यांचा रोजगार गेला होता, व्यवसाय बंद होता. त्यामुळे आता व्यवसाय सुरू झाल्याने, सर्वच प्रकारची दुकाने माल विक्रीसाठी आणल्याने सज्ज झाली आहेत. म्हणून दिनांक ७ पासून जळगाव जिल्हा अनलॉक झाला आहे. म्हणून चोपडा शहरात सकाळी साडेआठ वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत तोबा गर्दी होत असते. मात्र, नागरिकांना आता सकाळी बाजार करून घ्यायची सवय पडल्याने दुपारी शुकशुकाट दिसून येतो.
तसेच जळगाव जिल्हा अनलॉक झाला असला, तरी एका दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक नसावेत, असा नियम आहे. या नियमाला मात्र दुकानदारांकडून तिलांजली दिली जात आहे. पाच ग्राहकांपेक्षा दहा ते पंधरा काही दुकानांमध्ये वीस ते पंचवीस, तीस ग्राहक दिसून येत आहेत. कापड विक्री दुकानांमध्ये अशी गर्दी दिसून येत आहे. म्हणून या गर्दीमुळे पुन्हा कोरोना वाढणार तर नाही ना, अशी भीती जाणकार नागरिक व्यक्त करीत आहेत.
सध्या नगरपालिकेकडून ही पूर्वीचे पथके कार्यान्वित असली, तरी सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे सध्या पथके निष्क्रिय आहेत. या पथकांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन ज्या दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक असतील, अशा दुकानदार मालकांना समज देऊन गर्दी होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा कोणीच कोणाला बोलणार नाही, म्हणून अशीच गर्दी वाढत राहिली, तर कोरोनाची गेल्या चार महिन्यांची पुनरावृत्ती तिसऱ्या लाटेच्या रूपाने होऊ शकते.
दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त फटका चोपडा तालुक्याला सर्वात आधी बसलेला आहे. कोरोनामुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. अनलॉकनंतर पालिका प्रशासनाची चोपडा शहरात भूमिका काय असणार, हे जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही.
सध्या सर्वच प्रकारचे दुकाने सुरू असल्याने काय कारवाई करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रथम फेजमध्ये जळगाव जिल्हा असल्याने सर्व दुकाने वेळेच्या बंधनाशिवाय सुरू आहेत. नगरपालिकेतील पथके कार्यान्वित आहेत, परंतु कारवाई काय करावी, कोणत्या आधारावर करावी, असा प्रश्न आहे. मात्र, पोलीस प्रशासनाच्या मदतीने ज्या दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहक असतील, अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
-नीलेश ठाकूर, प्रशासकीय अधिकारी, चोपडा नगरपालिका