'सगळे म्हणतात सरकारचा रिमोट माझ्याकडे, पण...'; पवारांनी सांगितलं 'पॉवरफुल्ल' कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 12:28 PM2020-02-15T12:28:01+5:302020-02-15T14:35:15+5:30
मोदी हे राजकारणात मोठे भारी आहेत.
जळगाव/चोपडा : आजकाल सर्वत्र एकच चर्चा असते ती म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना सरकारचे रिमोट माझ्या हातात आहे. मात्र तसे नाही तर जो मुख्यमंत्री पदाच्या जागेवर बसतो तो पक्का होतो. आम्ही तिघेही पक्ष केवळ शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा व त्याच्या घामाचे मोल त्याला मिळावे, यासाठी एकत्र आलो आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चोपडा येथे केले.
चोपडा येथे पवार यांच्या उपस्थितीत सकाळी चोपडा येथे चोपडा सुतगिरणीच्या प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी सकाळी झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
मोदी राजकारणात भारी
पवार म्हणाले की, आज देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. सर्वत्र मंदी आहे. जनतेने नरेंद्र मोदी यांच्याकडे देश चालवायला दिला आहे. मात्र देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही की शेतमालाला भाव मिळत नाही. मोदी हे राजकारणात मोठे भारी आहेत. बारामतीमध्ये येऊन ते म्हणतात मी शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात आलो तर दुसरीकडे वेगळेच बोलतात, असे सांगून मोदी हे राजकारणात भारी आहेत, असेही पवार यांनी नमूद केले.