चांगल्या सेवांना राजकीय अडसर का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:22 PM2019-08-04T13:22:48+5:302019-08-04T13:23:13+5:30
जि़ प.तील बाह्य रूग्ण विभाग हलविणे राजकीय दबावाचे मोठे उदाहरण
आनंद सुरवाडे
जिल्हाभरात आरोग्य सेवा तेवढी सक्षम नसल्याची उदाहरणे वांरवार समोर येत असतात, अशातही जिल्हा परिषदेत एक ओपीडी सुरू करून किमान प्रशासकीय कार्यालयात अशी सेवा देऊन एक उत्तम उदाहरण समोर ठेवण्यात आले होते़ मात्र, ही ओपीडीही राजकीय दबावाची बळी ठरली व चांगल्या सेवांमधील राजकीय अडसर पुन्हा एकदा समोर आला आहे़ उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी ही ओपीडी अगदीच दोन तासात हलवून सध्या बंदच असलेल्या सरपंच कक्षाच्या मोकळ्या खोलीचे उद्घाटन करणे म्हणजे, अत्यावश्यक सेवांना वगळून केवळ देखाव्याला प्राधान्य देण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत घडला़
जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, अभ्यंगतांसाठी आरोग्य सेवा म्हणून प्राथमिक तपासण्या म्हणून, काही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ वैदयकीय सेवा म्हणून बाह्य रूग्ण कक्ष सुरू करण्यात आला होता़ याचा उपयोगही चांगल्या प्रकारे होत होता़ मध्यंतरीच्या कालखंडा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर व उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या वादात ठिणगी पडली व प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय यंत्रणा कशी मात करू शकते याची मोठी स्पर्धा सुरू झाली़ अगदी डॉ़ कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करून त्यांच्या चौकशीसाठी यंत्रणा इतकी सक्रिय करण्यात आली की, आदेश देताच दुसऱ्या दिवशी चौकशी सुरू झाली, दुसºया प्रकरणांमध्ये मात्र ही तत्परता जिल्हा परिषदेत कधीच पाहायला मिळालेली नाही़ शिवाय डॉ़ कमलापूरकर यांच्यावरील कारवाईची मागणी ज्या जोमाने झाली, चांगल्या कामांसाठी तसा पाठपुरावा कधी जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला नाही, खुद्द काही सदस्यच आता याबाबत बोलायला लागले आहे, डॉ़ कमलापूरकर यांची बदली करून राजकीय यंत्रणेने जिंकण्याचा आनंद साजरा केला जरूर मात्र, त्यांनी सुरू केलेला एक चांगला उपक्रम तत्काळ बंद करून त्या ठिकाणी सरपंच कक्षाचे उद्घाटन करून दबावाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले, नुकत्याच एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने या ओपीडीचीच सर्वांना आठवण झाली़ हे त्या कर्मचाºयाच्या जीवावर बेतण्यावर आले होते़
राजकारणात लोकप्रतिनिधींमध्ये अपमान सहन करण्याचीही सहनशक्ती हवी, असा काहीसा सूर आता जिल्हा परिषदेत उमटायला लागला आहे़ विशेष बाब म्हणजे सरपंच कक्षाची ऐवढी काय घाई झाली होती की, अध्यक्षा उज्जवला पाटील यांना कसलीली कल्पना न देता व त्यांच्या येण्याची वाट न बघता या कक्षाचे उद्घाटन उरकण्यात आले़ असे अनेक अनुत्तरीत प्रश्न या प्रकारामुळे समोर आले आहे़
डॉक्टर नसल्याने आम्हीच काही करू शकत नव्हतो, असा काहीसा खुलासा आरोग्य विभागाकडून येणे म्हणजे या प्रकारापुढे सर्व हतबल होते़ जर ओपीडी हलविली नसतील तर आरोग्य विभागातील काही डॉक्टर त्या ठिकाणी काही वेळ थांबत गेले असते, असेही सांगण्यात येत आहे़
एकीकडे पालकमंत्री गिरीश महाजन हे आरोग्यदूत म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे, मोठ मोठी आरोग्य शिबिरे घेऊन त्यांनी आरोग्य सेवेचे महत्त्व व त्याची अत्यावश्यकता वारंवार सर्वांच्या समोर आणली आहे, अशा परिस्थीत त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत अध्यक्षांना न विचारता बाह्य रूग्ण विभागाची औषधी वाºयावर फेकून देण्यात येते, डीएचओंची बदली होताच बाह्य रूग्ण विभागही हलविण्यात, पर्यायी बंदच करण्यात येतो हा प्रकार विरोधभासी असून आरोग्यदूत म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन हा कक्ष पुन्हा सुरू करतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़