अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:45+5:302021-05-27T04:16:45+5:30
महाडीबीटी पोर्टल वर ३ हजार ३६८ शेतकऱ्यांची नोंदणी : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाकडून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी या वर्षी ...
महाडीबीटी पोर्टल वर ३ हजार ३६८ शेतकऱ्यांची नोंदणी :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाकडून शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी या वर्षी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना २४ मेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज दाखल करावयाचे होते. त्यानुसार, जिल्ह्यातील ३ हजार ३६८ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज दाखल केले असून, अर्ध्यामधून प्राप्त निधीत बसेल, इतक्या शेतकऱ्यांची जिल्हा कृषी कार्यालयाकडून सोडत काढण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी बियाण्यांचा अनुदानासाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशा शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांसाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके व शेती संदर्भातील अवजारांची मागणी करण्यासाठी कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यावर चालू खरीप हंगामाची मागणी नोंदवली जात असून, २४ मेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्हा या पोर्टलवर शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिलेला दिसून येत नाही. जिल्ह्यातून केवळ तीन हजार शेतकऱ्यांनी या पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे.
कोणत्या योजनेसाठी किती अर्ज
प्रमाणित बियाणे वितरण - १,४६२
पीक प्रात्यक्षिक नोंदणी - १,५५३
मिनी किट पोर्टल नोंदणी - ३५३
एकूण नोंदणी - ३,३६८
मिनी किटसाठी कमी नोंदणी
महाडीबीटी पोर्टलवर सर्वाधिक नोंदणी ही मिनी किट म्हणजे यांत्रिक अवजारासाठी होत असते. मात्र, जळगाव जिल्ह्यात उलटे चित्र पाहावयास मिळत असून, सर्वात कमी नोंदणी मिनी किटसाठी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील ३५३ शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे.
एसएमएस आला तर...
ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना लॉटरीअंतर्गत कृषी विभागाकडून एसएमएस पाठविले जातील. एसएमएस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ही माहिती देऊन, ज्या कृषी केंद्रावरून बियाणे घ्यायची आहे. त्याबाबतची पावती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
एसएमएस आला, तरच मिळणार अनुदानित बियाणे
१. २४ मेपर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ३६८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, प्रमाणात बियाण्यासाठी १,४६२ शेतकऱ्यांचे नोंद झाली आहे.
२. बियाणे वाटप प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने होणार असून, लवकरच कृषी विभागाकडून याबाबतची लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे.
३. लॉटरीनुसार ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे. अशा शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागाकडून एसएमएस पाठविले जाणार आहेत. एसएमएस मिळाला, तरच अनुदानित बियाण्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जिल्ह्यातून केवळ ३ हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी
१. महाडीबीटी पोर्टलला राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असताना, जळगाव जिल्ह्यात मात्र शेतकरी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
२. जळगाव जिल्ह्यातील केवळ ३,३६८ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजनांसाठी अर्ज दाखल केले आहेत.
३. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी अजूनही ऑनलाइन प्रक्रियेत पूर्णपणे तयार झालेले नाहीत. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत नसल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व माहितीही देण्यात आली होती.
अर्ज केलेले शेतकरी म्हणतात...
खरीप हंगामासाठी अनुदानावर बियाणे मिळतील, अशी अपेक्षा आहे. त्यात जिल्ह्यात जास्त नोंदणी झाली नसल्याने, ऑनलाइन सोडतीमध्येही माझा नंबर लागण्याची शक्यता आहे.
- समाधान पाटील, शेतकरी
महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून शेतकऱ्यांसाठी चांगली सुविधा असली, तरी जिल्ह्यात असून या योजनेला फारसा प्रतिसाद दिसून येत नसतानाही, डीबीटी पोर्टलवर अवजारही चांगल्या प्रतीची मिळतात.
- रमाकांत पाटील, शेतकरी