आठवडाभरात एकाच कुटुंबातील तिघांना हिरावले कोरोनाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:12 AM2021-05-03T04:12:11+5:302021-05-03T04:12:11+5:30
येवले कुटुंबावर दु:खाचा डोंगर : एप्रिलचा शेवटचा आठवडा गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची लागण होऊन एकाच ...
येवले कुटुंबावर दु:खाचा डोंगर : एप्रिलचा शेवटचा आठवडा गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची लागण होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील रायसोनी नगरात घडली आहे. या घटनेमुळे येवले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आधी काका, मग पत्नी आणि आता वडिलांना कोरोनाने आमच्यातून हिरावल्याचे रायसोनी नगरातील रहिवासी विवेक येवले यांनी सांगितले.
कोरोनामुळे अनेक कुटुंबच्या कुटुंब उदध्वस्त हाेत असल्याचे भयावह चित्र या दुसऱ्या लाटेत समोर आले आहे. कुणी आई-वडील तर कुणी तरुण मुलगा, मुलगी या कोरोनाच्या संकटात गमावले आहे. येवले कुटुंबातही एका आठवड्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. यात विवेक येवले यांचे काका रमेश रामदास येवले (८९) यांना त्रास व्हायला लागल्याने त्यांची कोविडची तपासणी केल्यानंतर ते १० एप्रिल रोजी बाधित आढळून आले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विवेक येवले यांच्यासह त्यांचे वडील,पत्नी व मुलीने १२ रोजी कोरोना तपासणी करून घेतली. यात त्यांचे वडील वसंत रामदास येवले ८४ व त्यांच्या पत्नी अलका येवले ४८ हे बाधित आढळून आले.
काही दिवसांच्या अंतराने मृत्यू
रमेश येवले यांनी २४ एप्रिल रोजी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. यानंतर अलका येवले यांना कमी त्रास असल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्रास वाढून त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालय व त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी २६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर १ मे रोजी विवेक येवले यांचे वडील वसंत येवले यांचेही निधन झाले.
मुलींवर माया
अलका येवले यांचे मुलींवर खूप प्रेम होते. त्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत होत्या. आम्हाला कसलीच कमी जाणवू दिली नाही. मोठ्या मुलीचे अगदी थाटात लग्न झाले. दुसरी मुलगी दहावीला आहे; मात्र आता पत्नी, काका, वडील गेल्याने होत्याचे नव्हते झाले. हसणारे कुटुंब असे एका आठवड्यात दु:खात बुडाले, अशा भावना विवेक येवले यांनी व्यक्त केल्या.