खोगीरभरती न करता, आता कामांवर लक्ष देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:19+5:302021-06-03T04:12:19+5:30
शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची भूमिका : नवग्रह मंडळाची गट तयार करून, पक्षात दबदबा वाढवण्याची रणनिती लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...
शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची भूमिका : नवग्रह मंडळाची गट तयार करून, पक्षात दबदबा वाढवण्याची रणनिती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत शिवसेनेने सत्ता संपादन केली आहे. मात्र, सत्ता संपादन केल्यानंतरदेखील शिवसेनेच्या एका गटाकडून भाजपचे नगरसेवक फोडून सेनेच्या गटात आणण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आता सेनेतच काही प्रमाणात अंतर्गत कुरघोडीला सुरुवात झाली आहे. आता इतर नगरसेवकांची खोगीर भरती न करता उर्वरित कालावधीत शहराची कामे मार्गी लावण्यावर भर देण्याची गरज असल्याच्या कानपिचक्या शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.
भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फोडून शिवसेनेने महापालिकेत सत्ता काबीज केली आहे. त्यातच राज्यातदेखील शिवसेनेची सत्ता असल्याने, शहराच्या विकासासाठी निधीचीदेखील उपलब्धता पुढील काळात होणार आहे. त्यात पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसीमधून शहराच्या विकासासाठी तब्बल ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे, शहरातील विकासाचा राहिलेला ''बॅक लॉग '' शिवसेनेला भरावा लागणार आहे. महापालिकेत सत्ता येऊन आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असून, आता खऱ्या अर्थाने कामांना सुरुवात करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. अशा परिस्थितीत केवळ शहराच्या विकासासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मात्र, अशा परिस्थितीत भाजपचे अजून काही नगरसेवक फोडण्याची तयारी शिवसेनेच्या एका गटाकडून सुरू आहे. मात्र, एका गटाकडून आता नगरसेवकांची खोगीर भरती करण्याची गरज नाही, अशी भूमिका घेतली आहे. जे नगरसेवक पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्या नगरसेवकांच्या जोरावर महापालिकेत शिवसेनेची सत्ता कायम राहील. त्यामुळे आता इतर नगरसेवकांना घेऊन घोडेबाजार किंवा खोटी आश्वासने देण्याची गरज नसल्याचेही काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवग्रह मंडळ मात्र अतिउत्साहात
एकीकडे शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून भाजपचा लावण्यात आलेला करेक्ट कार्यक्रम आता पूर्ण झाला असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे मात्र भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या काही बंडखोर नगरसेवकांचे तयार झालेले नवग्रह मंडळ मात्र भाजपचे अजून काही नगरसेवक फोडण्याचा तयारीत आहे. नवग्रह मंडळातील काही सदस्य आता, थेट शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनादेखील विश्वासात न घेता थेट मुंबईच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याची रणनिती आखत आहेत. यामुळे भविष्यात भाजपमध्ये जी गटबाजी वाढली होती, तीच गटबाजी शिवसेनेतदेखील वाढण्याची शक्यता असल्याची भीती सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
फुटीर नगरसेवकांच्या गटासाठी ८ सदस्यांची कमतरता
दरम्यान, नवग्रह मंडळातील एका नगरसेवकाने दिलेल्या माहितीनुसार, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी भाजपमधून फुटलेल्या नगरसेवकांचा एक गट तयार करणे आवश्यक आहे. आतापर्यंत भाजपमधून ३० नगरसेवकांनी फुटून सेनेला पाठिंबा दिला आहे. भाजपच्या ५७ नगरसेवकांपैकी दोन तृतीयांश नगरसेवक फुटले तरच एक स्वतंत्र गट तयार होऊन, अपात्रतेच्या कारवाईपासून नगरसेवक वाचू शकतात. यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांना सेनेच्या गळाला लावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी अजून आठ नगरसेवकांची कमतरता भासत असून, लवकरच ही संख्यादेखील पूर्ण करण्यात येईल, असा दावा नवग्रह मंडळातील नगरसेवकांकडून केला जात आहे.