उपचार मिळेना, ‘नॉन कोविड’चा मुद्दा गंभीरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:40 AM2020-08-19T11:40:11+5:302020-08-19T11:40:33+5:30
विनवण्या करूनही रुग्णांकडे दुर्लक्ष : खाजगीत रात्री थेट नकारघंटाच
जळगाव : कोविडच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असताना नॉन कोविड रुग्णांना शासकीय पातळीवर तातडीने वेळेवर उपचार मिळतील याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे़ अन्य कुठलाही आजार असो, खाजगीत विनवण्या करूनही उपचार मिळत नसल्याचे गंभीर चित्र पुन्हा एकदा निर्माण झाले आहे़ गेल्या दोन दिवसातील दोन घटनांनी हा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आह़े त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
दोन दिवसांपूर्वी एका मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे़ या आधीही अनेक घटनांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना, तशा तक्रारी समोर आलेल्या आहेत़ अशा स्थितीत नॉन कोविडसाठी आताही पुरेशी यंत्रणा उभी राहत नसून खासगी रुग्णालयांवरही रुग्णांना दाखल करून घेण्यासंदर्भात प्रशासनाने कुठल्याही सूचना किंवा नियंत्रण नसल्याचे चित्र वारंवार समोर येणाऱ्या घटनांमधून दिसते.
आयुर्वेदीक महाविद्यालयात सद्य स्थितीत ८ डॉक्टर्स, दहा परिचारिका व दहा कक्षसेवक आहेत़ परिस्थतीनुसार ते वाढवता येतील,कक्ष व शस्त्रक्रिया विभागही तयार आहेत़ काही यंत्रणा व डॉक्टर्स उपलब्ध झाल्यानंतर ही सेवा सुरू होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ़ मिलिंद निकुंभ यांनी यावेळी बोलताना सांगितले.
एका गृहस्थांनी कथन केलेले अनुभव
आईचे वय ७४, रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक आईला घाम सुरू झाला व आई बेशुद्धावस्थेत गेली़ आईची रक्तातील साखर कमी झाली असेल आम्ही लगेच ओळखले़ मात्र, तात्काळ उपचारांची आवश्यकता होती़ आम्ही मधुमेहतज्ज्ञांकडे गेलो़ रात्रीची वेळ कंपाऊंडर बाहेर आला़ त्याने आॅक्सिमिटरने तपासले व डॉक्टर नसल्याचे सांगितले़ आम्ही विनवण्या केल्या मात्र, त्याने ऐकूण घेतले नाही़ आम्ही तेथून आकाशवाणीचौकातील अन्य एका खासगी रुग्णालयात गेलो़ त्या ठिकाणीही डॉक्टरांनी नकार दिला आम्ही तिसºया रुग्णालयात गेलो़ त्या ठिकाणी दाखल करून घेतले व दोन सलाईन लावल्या़ तेव्हा आई शुद्धीवर आली़ मात्र, डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या व न्यूमोनिया असल्याचे सांगत आम्ही या ठिकाणी दाखल करू शकत नाही, असे सांगितले़ अखेर रात्री दोन वाजता आईला डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नॉन कोविडला १२ डॉक्टर्स हवे
शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात नॉन कोविडच्या शंभर बेडची व्यवस्था उभी करण्यात येत आहे़ मात्र, या ठिकाणी यंत्रणा व डॉक्टर्स यामुळे हे काम काहिसे थांबले आहे़ त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कॅज्युलटी कक्षात जे डॉक्टर्स कार्यरत होते़ त्यांची टीम या ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू असून १२ डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास व एक्सरे, सोनोग्राफी आदी यंत्रणा सुरू झाल्यास आठवडाभरात नॉन कोविड रुग्णालय सुरू होईल, अशी माहिती आहे.
लक्तरे वेशीवर टांगणारी घटना
शहरातील एका प्रौढाच्या तोंडाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती़ तशाच परिस्थितीत ते सहा तास फिरत राहिले, मात्र, त्यांच्यावर कुठेही उपचार झाले नव्हते, अखेर कोविड रुग्णालयात ड्रेसिंग करून त्यांना रात्री खासगी रुग्णालयात उपचार मिळाले होते़ या घटनेमुळे नॉन कोविडसाठी कुठलीच वैद्यकीय सेवा नाही व प्रशासनाच्या उपाययोजनाच नसल्याचा प्रत्यय या घटनेतून आला होता़ मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून काहीही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.
रुग्णांनी उपचारांसाठी योग्य ठिकाणी जाणे गरजेचे आहे़ आपात्कालीन स्थितीत अतिदक्षता विभागात जाणे गरजेचे असते़ सद्य स्थितीत सर्व काळजी घेऊन सर्वच डॉक्टर्स सेवा देत आहेत़ अनेक खासगी रुग्णालयांमध्य तर बेड उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती आहे़ रुग्णालयात रुग्ण घेतला जात नाही, असे म्हणणे चुकीचे आहे़ योग्य उपचारासाठी रुग्णांनी योग्य ठिकाणी जाणे महत्त्वाचे आहे.
-डॉ़ स्रेहल फेगडे, सचिव, आयएमए