खराब रस्त्यामुळे दुचाकीवरुन महिला पडली अन् मागून आलेल्या ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:48 PM2020-12-24T20:48:50+5:302020-12-24T20:49:00+5:30
महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ अपघात; एक गंभीर; रस्त्याने घेतला पुन्हा बळी
जळगाव : खराब रस्ता व गतिरोधक यामुळे दुचाकीवर बसलेल्या मीना किशोर तळेले (वय ५३,रा. प्रभात कॉलनी) या खाली पडल्या व त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेला ट्रक अंगावरुन गेल्याने मीना यांचा जागीच मृत्यू झाला तर पती किशोर हिरामण तळेले गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ घडला. पुन्हा एकदा खराब रस्त्याने महिलेचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर हिरामण तळेले व त्यांची पत्नी मीना हे गुरुवारी एमआयडीसीत एका कार्यक्रमासाठी दुचाकीने (क्र.एम.एच १९ डी.सी ६०२५) नातेवाईकांकडे गेले होते. सायंकाळी तेथून घरी परत येत असताना महामार्गावर बॉम्बे बेकरीजवळ खराब रस्ता व गतिरोधकामुळे मीना यांचा तोल गेला व त्यात दुचाकीवरुन खाली पडल्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकच्या खाली मीना चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला. तर पती किशोर हे गंभीर जखमी झाले असले तरी नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले. अपघात इतका भयंकर होता घटना पाहणाऱ्यांचा अक्षरश: थरकाप उडाला.
ट्रक चालकाची माणुसकी शून्य भावना
या अपघातानंतर ट्रक चालकाने थांबून मदत करण्याऐवजी भीपीपोटी पळ काढला. अपघातात मृत्यू झाल्याचा पक्की खात्री झाली असतानाही चालकाने थांबण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान, नागरिकांनी धाव घेण्याआधीच ट्रक तेथून पसार झाला, त्यामुळे तिचा क्रमांकही लिहीता आला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताचा एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी, कर्मचारी अल्ताफ पठाण, नितीन पाटील, इम्रान शेख, गणेश शिरसाळे, तुषार चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने दाम्पत्याला सरकारी रुग्णालयात हलवून गर्दीमुळे ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, मीना तळेले यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे यांनी घटनास्थळ तसेच मृतदेहाचा पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू पाहून पतीचे भान हरपले
या अपघातात पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू, शरीराचा झालेला चेंदामेंदा पाहून पती किशोर तळेले सुन्न झाले. काय झाले व काय करावे हे काही क्षण त्यांना काहीच कळले नाही. रुग्णालयात दाखल करतानाही त्यांचा प्रचंड आक्रोश सुरु होता, घटनास्थळावरील चित्र पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मीन यांच्या पश्चात पती किशोर तळेले, कुंदन आणि चंदन हे दोन मुले आहेत.