महिला विक्रेत्याने मनपा कर्मचाऱ्यांसमोर फेकला पैशांचा गल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:36+5:302021-05-07T04:16:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एका महिला विक्रेती व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये व्यवसाय बंद करण्यावरून गुरुवारी सकाळी वाद झाला. त्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एका महिला विक्रेती व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये व्यवसाय बंद करण्यावरून गुरुवारी सकाळी वाद झाला. त्यात संतापलेल्या महिलेने पैशांचा गल्ला मनपा कर्मचाऱ्यांच्या दिशेने फेकून मारला. मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला इशारा दिल्यानंतर देखील वाद सुरूच असल्याने उपायुक्तांनी मुख्य बाजार पेठ परिसरात असलेल्या सर्व भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाईदरम्यान २० हून अधिक विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला.
मनपा पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर शहर व शनिपेठ पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना देखील बोलाविण्यात आले. पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर मनपा कर्मचारी व विक्रेत्यांमधील वाद शांत झाला. काही वेळातच मुख्य बाजारपेठ परिसरातील सर्व विक्रेत्यांनी आपली दुकाने जमा करून पळ काढला. दरम्यान, गुरुवारीदेखील शहरातील दाणा बाजार, फुले मार्केट परिसर व सराफ बाजार या भागात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना व्यवसाय करण्यास सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने आखून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा पुढेही व्यवसाय करत असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
शहरात आता अनेक भागांमध्ये निर्धारित वेळेपेक्षाही पुढे व्यवसाय थाटले जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांची गर्दीदेखील दुपारी बारा वाजेपर्यंत कायम राहत असून, अनेक नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून दररोज मुख्य बाजारपेठ परिसर असो वा उपनगरांमधील परिसर असो ज्या ठिकाणी अनधिकृतपणे दुकाने थाटली जात आहेत, अशा ठिकाणी दररोज कारवाई केली जात आहे. गुरुवारीदेखील शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, दाणा बाजार, घाणेकर चौक, टॉवर चौक, चित्रा चौक व राजकमल टॉकीज परिसर या भागात सकाळी ११ वाजेनंतर देखील अनेक विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. तसेच भाजीपाला विक्रेतेदेखील रस्त्यावर आपले व्यवसाय थाटून होते.
उपायुक्त यांचे पथक आल्यानंतर पळापळ आणि गोंधळ
सकाळी ११.१५ वाजेदरम्यान मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी केली. उपायुक्तांची पथक दाखल होताच बाजार पेठेत विक्रेत्यांनी पळ काढला, तर अनेक विक्रेते दुकाने थाटून उभेच होती. उपायुक्तांनी संबंधित विक्रेत्यांना लवकरात लवकर माल जमा करून व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, काही विक्रेते व्यवसाय बंद करीत नसल्याने, मनपा कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांना कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावर काही कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये वादाला सुरुवात झाली.