ग्राहक म्हणून आलेल्या महिलांनी लांबविल्या अडीच लाखाच्या सोन्याच्या बांगड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:32 PM2019-04-22T21:32:38+5:302019-04-22T21:37:44+5:30
ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी सेल्समनची नजर चुकवून ७४ ग्रॅम वजनाच्या अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबविल्याचा प्रकार नवीन आर.सी.बाफना ज्वेलर्स या सराफ दुकानात उघडकीस आला. संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या असून त्यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : ग्राहक म्हणून आलेल्या तीन महिलांनी सेल्समनची नजर चुकवून ७४ ग्रॅम वजनाच्या अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या लांबविल्याचा प्रकार नवीन आर.सी.बाफना ज्वेलर्स या सराफ दुकानात उघडकीस आला. संशयित महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या असून त्यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि, २० रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तीन महिला नयनतारा-१, आर.सी.बाफना ज्वेलर्स या सराफ दुकानात सोन्याच्या बांगड्या घेण्याच्या निमित्ताने दुकानात आल्या. सेल्समन धीरज शांतीलाल जैन यांनी महिलांना विविध प्रकारच्या बांगड्या दाखविल्या. जैन हे कामात असताना व शेजारील सेल्समनशी बोलत असताना एका महिलेने जैन यांचे लक्ष विचलित करुन बांगड्या शेजारील महिलेच्या हातात दिल्या. नंतर बांगड्या पसंत नसल्याचे सांगून या तिन्ही महिला तेथून निघून गेल्या.
रात्री उघड झाला प्रकार
रात्री साडे आठ वाजता नेहमी प्रमाणे विकलेला माल आणि उरलेला मालच्या स्टॉकची माहिती संकलित करीत असतांना सेल्समन धीरज जैन यांना ७६ ग्रॅम वजनाच्या व त्यात कुंदन व खळे असलेल्या चार बांगड्या कमी आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी हा प्रकार व्यवस्थापक निलेश जैन यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पुन्हा तपासणी केली असता त्यात चार बांगड्या कमीच दिसत होत्या. बांगड्या चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर सेल्समन धीरज जैन यांनी शनी पेठ पोलिसात फिर्याद दिली व सोबत सीसीटीव्ही फुटेजचही दिले. जैन यांच्या फिर्यादीवरुन तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.